शिवसेनेच्या माजी नगरसेवकांमध्ये जुंपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेच्या माजी नगरसेवकांमध्ये जुंपली
शिवसेनेच्या माजी नगरसेवकांमध्ये जुंपली

शिवसेनेच्या माजी नगरसेवकांमध्ये जुंपली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांमध्ये चांगलाच वाद झाल्याचे ठाण्यात पाहायला मिळाले. एकमेकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यापर्यंत हा वाद पोहोचल्याचे दिसून आले. माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता फाटक यांच्या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर गुरुवारी (ता. ५) विकास रेपाळे यांनी पत्रकार परिषद घेत माझ्या अंगावर आलात, तर मी शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच दिला. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे माजी नगरसेवकांच्या या वादावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग क्रमांक १९ च्या नगरसेविका नम्रता फाटक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लुईसवाडी आणि तीन हात नाका परिसरात बॅनर्स लावण्यात आले होते. हे बॅनर फाडण्यात आले होते. स्थानिक राजकारणातील सुंदोपसुंदीमुळेच हा प्रकार घडल्याची चर्चा होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता फाटक यांच्यातील वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला. याबाबत पत्रकार परिषद घेऊन विकास रेपाळे यांनी खुलासा केला आहे.

रहेजा गार्डन येथे सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते; पण त्या ठिकाणी दुसरेच काम सुरू असल्याने सौंदर्यीकरणाच्या कामाला अडथळा निर्माण होणार होता. म्हणून हे काम करू नका, असे सांगितल्यावर नम्रता फाटक थेट शिवीगाळ करत अंगावर आल्या, असे रेपाळे यांनी सांगितले. पूर्ण व्हिडीओ माझ्याकडे असून पक्षाची जबाबदारी असल्याने मी तो समोर आणणार नसल्याचे रेपाळे म्हणाले. मला टार्गेट करण्याचा पूर्वनियोजित डाव असल्याचा आरोप त्यांनी फाटक यांच्यावर केला. दरम्यान, ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर असताना पक्षाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे अशा नगरसेवकांच्या संदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

….............
वाद नेमका कशासाठी?
वागळे पट्‍ट्यात शिवसेनेचे दोन गट असून या दोन्ही गटांचे एकमेकांशी सुरुवातीपासून पटत नाही. याचा फटका शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना बसत आहे. यापूर्वीही या दोन गटांमध्ये वाद झाले आहेत. मात्र, एवढ्या पातळीवर हा वाद झाला नव्हता. विकासकामे घेण्यावरून हा वाद अधिक रंगला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81332 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top