
बेस्ट-लोकलवर झळकणार भारत-इस्राईल दोस्ती
मुंबई, ता. ५ ः भारत-इस्राईल राजनैतिक संबंधांची ३० वर्षे साजरी करण्यासाठी मुंबईतील इस्राईलच्या वाणिज्य दूतावासाने एक विशेष जनसंपर्क मोहीम हाती घेतली आहे. त्या निमित्ताने बेस्टच्या ताफ्यातील १० बसवर भारत आणि इस्राईल यांच्यातील कृषी आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्यावर भाष्य करण्यात आले आहे. लवकरच मध्य रेल्वेच्या एका लोकलचाही त्यात समावेश होणार आहे.
आज, ५ मे रोजी इस्राईलच्या स्वातंत्र्याला ७४ वर्षे पूर्ण झाली. त्या मोहिमेचा भाग म्हणूनच पुढील महिनाभरासाठी बेस्टच्या विशेष बस मुंबईच्या रस्त्यांवर धावतील आणि भारत-इस्राईल संबंधांना उजाळा देतील. आजच्या दिवसाचे औचित्य साधून इस्राईलचे मध्य-पश्चिम भारतातील वाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह महाराणा प्रताप चौक आणि माझगाव ते मुंबई सेंट्रल आगार असा प्रवास विशेष बसने करून प्रवाशांना आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप केले. त्यांना भारत-इस्राईल यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांबद्दल माहिती दिली.
यहुदी राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्राईलसोबत भारताने २९ जानेवारी १९९२ रोजी पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, मुंबईमध्ये १९५० च्या दशकातच इस्राईलचे परराष्ट्र विभागाचे कार्यालय (कॉन्सुलेट) उघडण्यात आले.
समाजमाध्यमांमध्ये भारत-इस्राईल संबंधांची माहिती देणाऱ्या बस आणि लोकलशी संबंधित एक विशेष मोहीम आम्ही लवकरच हाती घेणार आहोत. बस आणि लोकल गाडीवर ‘प्राचीन सभ्यता... आधुनिक राष्ट्र’ आणि ‘भारत-इजराईल दोस्ती के तीस साल बेमिसाल’ अशा घोषणाही लिहिलेल्या आहेत, असे सांगण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81335 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..