स्वतःच्या भूमीत भाडेपट्ट्याने राहणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वतःच्या भूमीत भाडेपट्ट्याने राहणार नाही
स्वतःच्या भूमीत भाडेपट्ट्याने राहणार नाही

स्वतःच्या भूमीत भाडेपट्ट्याने राहणार नाही

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ५ : ९५ गावांतील शेतकऱ्यांची जमीन घेऊन अनेक प्रकल्प सिडकोने उभारले. मात्र आता गरजेपोटी घरांच्या बाबतीत सिडको व शासनाने घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. या भूमीची मालकी हक्क असलेला प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सिडकोने लादलेल्या निर्णयाच्या विरोधात आहे. प्रकल्पग्रस्त स्वतःच्या मालकीच्या भूमीत भाडेपट्ट्याने राहणार नाही, असा इशारा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी दिला आहे. महात्मा जोतिबा फुले सभागृहात लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी २४ जूनच्या नियोजित आंदोलनाप्रमाणे या विषयावरही आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

या बैठकीला समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, समितीचे संतोष केणे, जे. डी. तांडेल, दशरथ भगत, राजाराम पाटील, २७ गाव समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, विविध पदाधिकारी व प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारने बाजारभावानुसार दर आकारून गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तो निर्णय प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा नसल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. हा निर्णय घेताना प्रकल्पग्रस्त संघटना व त्यांच्या प्रतिनिधिनींकडून कुठल्याही सूचना मागवल्या गेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांचे मत विचारात न घेताच हा निर्णय प्रसिद्ध केला गेला. त्यामुळे पुन्हा एकदा सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांविरोधात डाव रचला असा सूर बैठकीत उमटला.
------------
अनेक प्रश्न अनुत्तरित
प्रकल्पग्रस्तांच्या २५० मीटरबाहेरील बांधकामांचे काय होणार याचे उत्तर सिडकोने दिले नाही. त्याचबरोबर प्रत्येक गावची भौगोलिक सीमा वेगवेगळी आहे. काही गावे महामार्ग किंवा खाडीलगत आहेत. तेथे एकाच दिशेस २५० मीटरपेक्षा जास्त बांधकामे वाढलेली आहेत. त्या गावातील प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामाचे काय होणार? प्रकल्पग्रस्तांच्या व्यावसायिक गाळ्यांचे काय? मालकी हक्काची मालमत्ता सोडून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ती भाड्याने नावावर करण्याची संमती सिडकोकडे का मागावी? असे अनेक प्रश्न या बैठकीत उपस्थित करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81341 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top