मुंबईत राजर्षी शाहू स्मारक आणि कोल्हापूर भवन उभारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत राजर्षी शाहू स्मारक आणि कोल्हापूर भवन उभारणार
मुंबईत राजर्षी शाहू स्मारक आणि कोल्हापूर भवन उभारणार

मुंबईत राजर्षी शाहू स्मारक आणि कोल्हापूर भवन उभारणार

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि वारसा जपण्यासाठी मुंबईत लोकराजाचे भव्य स्मारक आणि संग्रहालय उभारण्यात येईल, अशी घोषणा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केली. गिरगाव येथील खेतवाडीमध्ये राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. वरळीमध्ये कोल्हापूर भवन उभारण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू महाराजांचे वंशज मालोजीराजे छत्रपती आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खेतवाडीतील गल्ली क्रमांक १३ मधील पन्हाळा लॉज ज्या ठिकाणी होते तेथे १२ फुटांचा स्मृतिस्तंभ उभारण्यात आला असून त्याचे मान्यवरांच्या हस्ते आज उद्‍घाटन करण्यात आले.

आदित्य ठाकरे म्हणाले, की राजर्षी शाहू महाराज आणि माझे पणजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची मैत्री होती. १०० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी राजर्षींची आणि त्यांची भेट झाली होती. हा ऐतिहासिक क्षण आहे. १०० वर्षांनंतर मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळत आहे. माणुसकीचा धर्म पुढे नेण्यासाठी राजर्षी शाहूंनी नेहमी काम केले. आजही मी कोल्हापुरात जातो तेव्हा तेथील एकेक वास्तू आणि संस्था राजर्षींच्या कार्याची प्रचीती देतात. १०० वर्षांनी राजर्षींची आठवण काढण्यासारखे कार्य त्यांनी केले आहे. कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मृती शताब्दी समितीच्या सदस्यांनी स्मृतिस्तंभाची कल्पना मांडली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ती मूर्त स्वरूपात आणली. या सगळ्यांचे काम अभिनंदनीय आहे. राजर्षी शाहू महाराजांचे निधन खेतवाडीतील पन्हाळा लॉजवर झाली. त्यांची स्मृती तिथे असावी, अशी शाहूप्रेमींची अपेक्षा आहे. ती राज्य सरकारने मान्य केली. तसा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मुंबई विशेषत: वरळी, गिरगाव आणि दादर परिसरात कोल्हापूरवासीयांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्यासाठी वरळीमध्ये कोल्हापूर भवनही उभारण्यात येईल, असेही ते म्हणाले.

हसन मुश्रीफ म्हणाले, की राजर्षी शाहू महाराजांनी केवळ आपल्या संस्थानापुरता विचार केला नाही, तर संपूर्ण देशाला दिशा दिली. आरक्षणाचा विचार पटवून देत बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणले. मालोजीराजे छत्रपती म्हणाले, की शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षात जेथे त्यांचा देहांत झाला तेथे स्मृतिस्तंभ असावा, अशी शाहूप्रेमींची अपेक्षा होती. आम्ही आदित्य ठाकरे यांना तशी विनंती केली. त्यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि मुंबई पालिकेच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वाला गेले.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत प्रास्ताविकात म्हणाले, की राजर्षी शाहूंचे यंदाचे वर्ष स्मृती शताब्दी म्हणून साजरे होत आहे. त्यानिमित्त मुंबईत भव्य शाहू स्मारक व्हावे. हे मराठा बहुजनांच्या प्रबोधनाचे आणि चळवळीचे केंद्र व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत. प्रबोधनकार ठाकरे आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यातील वैचारिक वारसा आपण यानिमित्ताने जपू.

शाहीर दिलीप सावंत यांच्यासह त्यांच्या पथकाने शाहिरी पोवाडा सादर केला. मुंबईतील कोल्हापूरवासीय कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाकरे आणि छत्रपती घराण्याचा ऋणानुबंध
माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी छत्रपती आणि ठाकरे घराण्याच्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘आदित्य ठाकरे प्रबोधनकारांचे पणतू आणि मी राजर्षी शाहूंचा खापरपणतू आहे. राजर्षी शाहूंची आणि प्रबोधनकारांची १०० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी झालेली भेट आणि आजची त्यांच्या वंशजांची भेट हा अनोखा योग आहे. हे ऋणानुबंध कायम आहेत.’

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81346 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top