
भाजलेल्या कोविड रुग्णांना जीवदान
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : कोरोनाकाळात कोविडच्या रुग्णांसह इतर रुग्णांना आरोग्यसुविधा पुरवण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे होते. पालिकेने काही महत्त्वांच्या रुग्णालयांसह कस्तुरबा रुग्णालयालाही कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले होते; परंतु कस्तुरबा रुग्णालय हे भाजलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. कोरोना काळात कस्तुरबा रुग्णालयात भाजलेल्या ११ कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले.
मुंबईत मार्च २०२० पासून कोविड महामारी सुरू झाली. त्या परिस्थितीतही कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांनी भाजलेल्या कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार केले. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार २०२० ते २६ एप्रिल २०२२ या तीन वर्षांत एकूण ११ भाजलेल्या कोविड रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार केले. २०२० मध्ये भाजलेल्या तीन रुग्णांना कस्तुरबामध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची आरटीपीसीआर चाचणी केल्यावर ते कोविड पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर २०२१ मध्ये भाजलेल्या चार कोविड रुग्णांना दाखल करण्यात आले. कोरोना काळात भाजलेल्या कोविड रुग्णांना इतर रुग्णालयांत उपचार मिळणे दुरापास्त असल्याने कस्तुरबा रुग्णालय प्रशासनाने त्यासाठी विशेष वॉर्ड तयार केला होता.
----
५५ टक्के रुग्णांना वाचवण्यात यश
गेल्या अडीच वर्षांत कस्तुरबा रुग्णालयात भाजलेले एकूण ११ कोविड रुग्ण दाखल झाले होते. या रुग्णांवर कोविडचे आणि भाजल्यावर केले जाणारे उपचार करण्यात आले. कोविडसाठी रेमडेसिवीरसह बर्न्समध्ये लागणारे अँटीबायोटिक्स त्यांना देण्यात आले. यापैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला, तर इतर रुग्णांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी दिली.
---
सर्व रुग्ण जवळपास ३० ते ६० टक्के भाजलेले होते. त्यात कोविड झालेला असल्याने दुहेरी उपचार त्यांच्यावर करण्यात आले. योग्य उपचाराद्वारे भाजलेल्या कोविड रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
- डॉ. चंद्रकांत पवार, वैद्यकीय अधीक्षक, कस्तुरबा रुग्णालय.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81356 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..