
महामार्गावर चारोटी टोल नाक्यावर बर्निंग ट्रक
महेंद्र पवार : सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. ६ : मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोल नाक्यावर शुक्रवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर मालवाहू ट्रकला अचानक आग लागून ट्रकची केबिन व आतील माल जळाला.
चालक महेश कुमार पाल (वय २९) हा नवी मुंबई, तळोजा येथून ट्रकमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन सेल्वासा येथील कंपनीमध्ये जात होता. चारोटी टोल नाक्याजवळ घोळ गावात ट्रकमधील मालामध्ये धूर येऊ लागल्याने त्याने ट्रक थांबवून पाहणी केली; पण आजूबाजूस कोणी मदतीस येणार नाही, हे लक्षात घेत त्याने ट्रक काही अंतरावर असलेल्या टोलनाक्याजवळ उभा केला. त्यानंतर काही मिनिटातंच ट्रकमधील प्लास्टिक पिशव्यांनी पेट घेतला. आयआरबी व टोल कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला; पण आग मोठ्या प्रमाणात भडकली. महामार्ग पोलिस, कासा पोलोस घटनास्थळी पोहोचले, आयआरबीचा पाण्याचा टँकर आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात डहाणू अदाणी कंपनीची अग्निशमन यंत्रणा दाखल झाली आणि पुढच्या काही मिनिटांतच आग आटोक्यात आणली; पण या दुर्घटनेत ट्रकची केबिन व आतील बराचसा माल जळून खाक झाला. जेसीबीच्या सहाय्याने आतील माल बाजूला करत आग रोखण्याचा प्रयत्न केला.
अग्निशमन यंत्रणेची वानवा
महामार्गावर कायमच वाहनांना अचानक आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. यासाठी निदान मनोर ते तलासरीदरम्यान एखादी अग्निशमन दलाची गाडी असावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे; पण अजूनही आयआरबी महामार्ग प्रशासन याबाबत कोणतेही उपाय करत नाही. कारण महामार्ग आणि सध्या असणारे अग्निशमन दल यामध्ये ३० ते ४० किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे आग लागलेल्या जागी पोहचण्यासाठी एक तास लागतो.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81358 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..