
खारघरमधील पाणी पुरवठ्यासाठी ३१ मे ची मुदत
पनवेल, ता. ६ (नितीन देशमुख) : खारघर येथील अनियमित व अपुऱ्या पाणीपुरवठ्यात ३१ मेपर्यंत सुधारणा न झाल्यास कोणतीही नोटीस न देता सिडको भवनमध्ये घुसू आणि पाणी मिळत नाही, तोपर्यंत तेथेच मुक्काम करू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी खारघर येथील आंदोलनप्रसंगी दिला.
सिडकोने वसविलेल्या खारघरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. येथील नागरिकांना पाणीपुरवठ्याचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी सिडको कार्यालयात करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात भाजप खारघर-तळोजा मंडलच्या वतीने वेळोवेळी सिडकोकडे पाठपुरावा केला; मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने भाजपतर्फे शुक्रवार (ता. ६) उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यामध्ये खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती अ सभापती संजना कदम, नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, प्रकाश बिनेदार, बबन मुकादम, प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, रामजी बेरा, नीलेश बाविस्कर, नगरसेविका अनिता पाटील, नेत्रा पाटील, आरती नवघरे, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, महिला मोर्चाच्या बिना गोगरी, अमर उपाध्याय, गीता चौधरी, मोना अडवाणी सहभागी झाले होते.
-------------------------------
आंदोलक आक्रमक
सिडको कार्यकारी अभियंता एन. जे. चौथानी यांनी २० तारखेपर्यंत सगळे सुरळीत होईल, असे सांगितले. पण लोकांचा त्यांच्यावर आता विश्वास नाही. त्यामुळे ज्या सोसायटीत पाणी येणार नाही, त्यांना सिडकोने मोफत पाणीपुरवठा करावा अन्यथा सिडकोच्या अधिकाऱ्यांचे पत्ते शोधून पाण्याची भांडी घेऊन त्यांच्या घरी जाऊ. त्यांना झोपू देणार नाही. त्यांना आम्ही ३१ मेपर्यंत मुदत देतो. त्यांनी एमडींना सांगून सुधारणा करावी; अन्यथा सिडको भवनमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.
------------------------------------
कोट
आंदोलन केल्याशिवाय सिडकोला काही ऐकूच येत नाही. आज या भागात १ लाख नवीन घरे बांधली जात आहेत. या घरात सुमारे ५ लाख लोक राहायला येतील. आज येथील लोकांना पुरेसे पाणी मिळत नसताना हे नवीन लोक राहायला आल्यावर येथील पाण्याच्या परिस्थितीची कल्पनाच करता येणार नाही, म्हणून हे आंदोलन करावे लागत आहे.
- प्रशांत ठाकूर, आमदार
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81371 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..