
कोपरीकरांच्या पाण्यासाठी भाजपची महापालिकेवर धडक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : कोपरी भागात पाण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष होत आहे. काही दिवसांपूर्वी पाण्याच्या समस्येवरून माजी महापौर नरेश मस्के आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. कोपरीकरांना समान पाणीवाटप व्हावे, या मागणीसाठी शुक्रवारी भाजपच्या वतीने महापालिका मुख्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी सत्ताधारी कोपरीकरांचे पाणीदेखील चोरी करीत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार संजय केळकर आणि ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केला.
ठाणे शहरात विविध भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. आनंदनगर परिसरातील शेवटच्या वसाहतींपर्यंत पाणी जावे, यासाठी पालिका प्रशासनाने नियोजन केले. त्यासाठी आनंदनगर भागातील जलवाहिनीवर वॉल बसविला. या मुद्द्यावरून राजकारण पेटले असून, भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर पाणी पळवापळवीचा आरोप केला आहे; तर दुसरीकडे चव्हाण यांनी कोपरीत चुकीच्या पद्धतीने मोठ्या जलवाहिन्या टाकल्या असून टाकीच्या परिघात येत नसलेल्या भागांमध्ये जलवाहिन्यांची जोडणी दिली आहे. यामुळे पाणी नियोजन कोलमडून टंचाईची समस्या निर्माण होत असल्याचा आरोप माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे.
आश्वासनानंतर आंदोलन मागे
आंदोलकांनी पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, ६ दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळावे, अशी मागणी मुंबई महापालिकेकडे केली आहे. या वेळी पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81375 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..