उपनगरवासीयांची तहान भागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपनगरवासीयांची तहान भागणार
उपनगरवासीयांची तहान भागणार

उपनगरवासीयांची तहान भागणार

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ ः मुंबई उपनगरातील जास्त लोकसंख्येच्या विभागात येत्या काळात वाढीव पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मुंबई पालिकेच्या वतीने दोन जलाशयांच्या टनेलिंगचे काम सुरू आहे. याच प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशयापर्यंत जलबोगदा खोदकामाच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे ३.६ किमी लांबीचे टनेलिंग शुक्रवारी पूर्ण झाले. याचा फायदा मुंबई उपनगरातील नागरिकांना होणार आहे. 

पूर्व उपनगरातील ‘एम/पूर्व’, ‘एम/पश्चिम’ व ‘एल’ विभागाच्या चेंबूर, गोवंडी, मानखुर्द या काही भागात पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. पाणीपुरवठा प्रकल्प खात्यामार्फत अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय व पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयापर्यंत हा एकूण सुमारे ५.५२ किमी लांबीचा जलबोगदा बांधण्यात येत आहे. कोविडकाळातही या जलबोगद्याच्या कामात प्रशासनाने खंड पडू दिला नाही. प्रकल्पाचे काम ठरलेल्या मुदतीत म्हणजे ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्णत्वास जाईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

या जलबोगदा प्रकल्पांतर्गत अमर महल येथील हेडगेवार उद्यान व आर.सी.एफ. कॉलनी येथील ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलाशय येथे अनुक्रमे सुमारे ८१ मीटर व १०५ मीटर खोलीची दोन कूपके बांधण्यात आलेली आहेत. भाभा अणू विज्ञान संशोधन केंद्र येथील ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशय येथील सुमारे ११० मीटर खोलीच्या तिसऱ्या कूपकाचे काम प्रगतिपथावर आहे.
 
कसे चालले काम?
बोगद्याच्या खोदकामासाठी, हेडगेवार उद्यान येथील कूपकात बोगदाखनन यंत्र ६ मार्च २०२१ रोजी उतरविण्यात आले होते. जमिनीखाली सुमारे १०० ते ११० मीटर खोलीवर हा जलबोगदा बांधण्यात येत आहे. जानेवारी २०२२ मध्ये विक्रमी ६५३ मीटर खनन करण्यात आले होते; तर एकाच दिवसात ४० मीटरपेक्षा अधिक खनन करण्याची कामगिरीही एकाच आठवड्यात दोन वेळा करण्याची किमया पालिकेने साध्य केली होती. पहिल्या टप्प्यातील ३.६ किमी खनन शुक्रवारी विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे सुमारे ५५ टक्के काम पूर्ण झालेले असून, ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81383 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top