
जीव मारण्याची परवानगी मिळते कशी?
मुंबई, ता. ६ ः सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासांतर्गत नव्याने उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहासाठी झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकमान्य टिळक रुग्णालयाचे काम हे पाच टप्प्यांत होणार आहे. परंतु या वृक्षतोडीला अभिनेते सयाजी शिंदे यांनी विरोध केला आहे. ज्या रुग्णालयात जीव वाचवले जातात, तेथे १५८ जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी, असाही सवाल त्यांनी केला आहे. तसेच हा वृक्षतोडीचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले.
वसतिगृह उभारण्यासाठी वृक्षतोडीचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर ज्या रुग्णालयात जीव वाचवले जातात तिथे १५८ जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी? याला दुसरा काहीच पर्याय सायन रुग्णालयाकडे नाही का? असाही सवाल सयाजी शिंदे यांनी केला. त्याप्रमाणेच सयाजी शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला अपेक्षा आहे नव्या वसतिगृहासाठी झाडे तोडण्याचा निर्णय रुग्णालय मागे घेईल. आपल्या एका निर्णयामुळे असंख्य पक्ष्यांची घरटी, त्यातले छोटे जीव वाचणार आहेत. लोकमान्य टिळक रुग्णालयाचे काम हे पाच टप्प्यांत पार पडणार आहे. त्यामध्ये हॉस्टेल, वैद्यकीय अधिकारी वसाहत आणि पदवी शिक्षणासाठीच्या महाविद्यालयाचा समावेश आहे. एकूण पाच टप्प्यांपैकी पहिला टप्पा सध्या सुरू झाला आहे. त्यासाठी ६१६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एकूण १३.८९ लाख चौरस फूट क्षेत्रात होणाऱ्या पुनर्विकासाचे काम हे ६० महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणेच बाह्य रुग्ण विभाग, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, कर्मचाऱ्यांची १८२ घरांची वसाहत अशा प्रकारच्या बांधकामांचा समावेश आहे. त्याशिवाय आगामी काळात रुग्णालयातील बेडची संख्याही वाढवण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81386 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..