एशियाटीकला वाचकांचा मेळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एशियाटीकला वाचकांचा मेळा
एशियाटीकला वाचकांचा मेळा

एशियाटीकला वाचकांचा मेळा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : गेल्या चाळीस वर्षांत एशियाटिक लायब्ररीच्या आवारात आम्ही अशी गर्दी पाहिली नाही. ही पुस्तके रद्दीवाल्यांना विकावी लागणार की काय, अशी शंका होती. मात्र, वाचकांची गर्दी पाहून डोळ्याचे पारणे फिटले. एशियाटिक सोसायटीच्या मानद उपाध्यक्ष शेहनाज नलवाला या आनंदाने ही बाब ‘सकाळ’ला सांगत होत्या. एशियाटिक ग्रंथालयाकडे वाचकांना वळवण्यासाठी भविष्यात अशा स्वरूपाचे काही उपक्रम हाती घेणार असल्याचे संचालक मंडळाने सांगितले.

एशियाटिक सोसायटीला वर्षाला दान स्वरूपात ३०० ते ४०० पुस्तके मिळतात; मात्र यातील अनेक पुस्तके यापूर्वीच ग्रंथालयात उपलब्ध होती, अशी पुस्तकेही यात असतात. त्यामुळे आमच्याकडे असलेल्या जवळपास ३ लाख ५० हजार पुस्तकांचा संग्रह सांभाळणाऱ्यांची कसरत सुरू असताना ही पुस्तके ठेवायची कुठे, हा प्रश्नच होता. त्यामुळे जवळपास ३५ वर्षे पडून असलेली ३,५०० पुस्तके विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.

कोविडनंतर ग्रंथालयाची परिस्थिती बघता, पुस्तके खरेदी करायला वाचक येईल का, अशी शंका संचालक मंडळाला होती. म्हणून अत्यंत माफक दरात म्हणजे अगदी ३० रुपयामध्ये पुस्तके विक्रीसाठी ठेवली गेली. मात्र, गुरुवारी सकाळपासून पुस्तके खरेदी करण्यासाठी अर्धा किमीच्या रांगा लागल्या होत्या. पहिल्या चार तासांत ३,५०० पुस्तके हातोहात संपली. रांगामध्ये लागलेल्या ७० टक्के वाचकांना रिकाम्या हाती परत जावे लागले, अशी माहिती त्यांनी दिली. या ठिकाणी ३ दशके काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी अशी गर्दी कधी बघितली नव्हती, अशी प्रतिक्रिया नलवाला यांनी ‘सकाळ’ला दिली.

सभासद फॉर्म, टी मगची विक्री
पुस्तक खरेदीसाठी तरुणाईच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून या ग्रंथविक्रीचा उद्देश सार्थकी लागला, असे सोसायटीच्या सदस्या माधवी कामत यांनी सांगितले. याशिवाय शुक्रवारी जवळपास ७५ पेक्षा जास्त जणांनी सभासद अर्ज सोबत नेले. पुस्तके मिळाली नाही म्हणून अनेकांनी एशियाटिकचा लोगो असलेली बॅग, टी मग खरेदी केले. एकही वस्तू शिल्लक राहिली नसल्याचे कामत म्हणाल्या.

दुसऱ्या दिवशीही विचारणा
दुसऱ्या दिवशीही पुस्तकांच्या मागणीसाठी एशियाटिक लायब्ररीचे फोन खणखणत होते. नेदरलँड आणि अमेरिकेतूनही फोन आले; तर काही वाचकांनी पहिल्या दिवशी पुस्तके कशी काय संपली, यावरून भांडणही केले. शुक्रवारीही जवळपास शंभर वाचक पुस्तक खरेदीसाठी एशियाटिकमध्ये आले होते. सेल संपला, असा बोर्ड बघताच ते निराश झाले. यातील अनेक जणांनी एशियाटिक ग्रंथालयाचे सभासद अर्ज सोबत नेले.

या पुस्तकांवर वाचकांच्या उड्या
१. ब्रिटानिया इनसायकलोपिडिया खंड
२. ग्रीक इतिहास
३. अरबी कवितांचे खंड
४. सरकारी अहवाल
५. तत्त्वज्ञान आणि इतिहासावरची पुस्तके
४. मोजक्या मराठी कांदबऱ्या आणि इतर पुस्तके

एशियाटिक संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदा पुस्तकविक्री झाली आणि प्रंचड प्रतिसाद मिळाला. केवळ चार तासांत सर्व पुस्तके संपली. या निमित्ताने का होईना, एशियाटिक ग्रंथालय तरुणाईने, वाचकांनी भरून गेले. नवे वाचक ग्रंथालयाशी जोडले गेले. तरुणाईमध्ये वाचनाबद्दलची उत्सकता वाढली, याचे विशेष समाधान आहे.
- शेहनाज नलवाला, उपाध्यक्ष, एशियाटिक सोसायटी

दुर्मिळ पुस्तके मिळाली, याचा खूप आनंद आहे. त्याहीपेक्षा या निमित्ताने मला पहिल्यांदा एशियाटिक सोसायटीचे ग्रंथवैभव पाहायला मिळाले. मी तातडीने एशियाटिक सोसायटी ग्रंथालयाचे सदस्यत्व घेणार आहे.
- राजेश मोरे, ग्रंथप्रेमी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81390 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top