
कल्याण-डोंबिवलीत `सायकल संस्कृती`
रवींद्र खरात : सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. ७ : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात वाहतूक कोंडी कमी व्हावी, कल्याण-डोंबिवली नगरी प्रदूषणमुक्त व्हावी, नागरिकांचे शारीरिक स्वास्थ्य सुदृढ राहावे या दृष्टिकोनातून पालिका हद्दीत `सायकल संस्कृती` रुजविण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्यानुसार दररोज सकाळी पाच ते आठ या वेळेत शहरातील काही महत्त्वाचे मार्ग सायकलिंगसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. आता याच्या पुढेही जात शहरातील जे नागरिक नियमित स्वरूपात सायकलचा वापर करतात त्यांना `पर्यावरण दूत` म्हणून पालिकेतर्फे गौरवण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अधिपत्याखाली त्यांच्या दालनात कल्याणमधील सायकल प्रेमी, महापालिका अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महापालिका क्षेत्रात सायकल संस्कृती रुजविण्याच्या दृष्टिकोनातून अनेक लोकोपयोगी निर्णय घेण्यात आले.
शहरात सायकलसाठी कायमस्वरूपी मार्गिका उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन आराखडा तयार करण्याचे निर्देश शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांना देण्यात आले. शहरामध्ये उपलब्ध पार्किंगमध्ये सायकलसाठी २५ टक्के आरक्षण उपलब्ध करणे, रेल्वेस्थानक परिसरात सायकलसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मालमत्ता विभागाच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे शहरात दरवर्षी प्रभागनिहाय सायकल रॅलीचे व मुख्यालय स्तरावर ३ जून या आंतरराष्ट्रीय सायकल दिनाच्या दिवशी सायकल महोत्सवाचे आयोजन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
...यांचा होणार गौरव
- शहरातील जे नागरिक नियमित स्वरूपात सायकलचा वापर करतात.
- जे विद्यार्थी शाळा/महाविद्यालयांमध्ये नियमित सायकल वापरतात.
- नियमित सायकल वापरणारे महापालिका अधिकारी व कर्मचारी.
ॊॊ`पर्यावरण पालक` म्हणूनही गौरव
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी सायकलचा वापर करणे शक्य आहे, त्यांनी नियमितपणे सायकलचा वापर करावा. निदान आठवड्यातून एकदा दर मंगळवारी सायकलवरून कार्यालयात यावे, यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. तसेच सायकल वापरासाठी प्रोत्साहन देणाऱ्या शहरातील संस्थांना `पर्यावरण पालक` म्हणूनही गौरविण्यात येणार आहे.
सायकली दान करा
सायकल शिकू इच्छिणाऱ्या शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांना स्वतंत्र मैदाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक वर्षी शहरामध्ये सायकल वापरामध्ये किती वाढ झाली व त्या अनुषंगाने नेट झिरो, कार्बन क्रेडिट याची नोंद ठेवली जाणार आहे. या उपक्रमासाठी नोडल ऑफिसर म्हणून प्रशांत रा. भागवत, कार्यकारी अभियंता (विद्युत) यांची नेमणूक करण्यात आली आहे. शहरातील ज्या रहिवाशांकडे विनावापर सायकल पडून असतील, त्यांनी त्या सायकली पालिकेकडे दान कराव्यात. याबाबतच्या अधिक माहितीसाठी ९८२१११५६७८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81412 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..