अग्निसुरक्षेत मिरा-भाईंदरची सक्षमीकरणाकडे वाटचाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अग्निसुरक्षेत मिरा-भाईंदरची सक्षमीकरणाकडे वाटचाल
अग्निसुरक्षेत मिरा-भाईंदरची सक्षमीकरणाकडे वाटचाल

अग्निसुरक्षेत मिरा-भाईंदरची सक्षमीकरणाकडे वाटचाल

sakal_logo
By

प्रकाश लिमये : सकाळ वृत्तसेवा

भाईंदर, ता. ७ : मिरा-भाईंदर शहरात उभ्या राहत असलेल्या टोलेजंग इमारती आणि त्यासोबतच वाढत असलेली लोकसंख्या यांच्या सुरक्षेची बाब तेवढीच महत्त्वाची आहे. यादृष्टीने मिरा-भाईंदर महापालिकेचा अग्निशमन विभाग सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पालिकेच्या अग्निशमनच्या ताफ्यात तब्बल ३२ व्या माळ्यापर्यंत पोहोचू शकणारे `एरियल लॅडर प्लॅटफॉर्म` हे अत्याधुनिक वाहन नुकतेच दाखल झाले. मुंबई, ठाणे या महापालिकांनंतर हे वाहन खरेदी करणारी मिरा-भाईंदर ही तिसरी महापालिका ठरली आहे.
------
मिरा-भाईंदर शहरात सध्या गगनचुंबी इमारती बांधण्याची स्पर्धाच सुरू आहे. महापालिकेकडून ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना मंजुरी दिली जात आहे. त्यामुळे ३० माळ्यांहून अधिक मजल्याच्या इमारती उभ्या राहत आहेत; मात्र या इमारतींची अग्निसुरक्षा करण्याची व्यवस्था महापालिकेकडे नव्हती. पालिकेकडे ३९ आणि ६७ मीटरपर्यंत पोहोचू शकणारी दोन टर्न `टेबल लॅडर` ही अत्याधुनिक वाहने आहेत. मात्र आता त्यापलिकडेही पोहोचू शकणारे ९० मीटर क्षमतेचे एरियल लॅडर प्लॅटफॉर्म (एएलपी) हे अत्याधुनिक विदेशी बनावटीचे वाहन महापालिकेने खरेदी केले आहे. या वाहनाची किंमत सुमारे २२ कोटी रुपये इतकी आहे.
गगनचुंबी इमारतींना केवळ १८ मीटर रुंद असलेल्या रस्त्यावरच परवानगी दिली जाते. त्यामुळे हे अत्याधुनिक वाहन या रस्त्यांवर सहज जाऊ शकते. विविध वैशिष्ट्ये असलेल्या या वाहनामुळे महापालिकेचे अग्निशमन दल अधिक सशक्त झाले आहे. हे अत्याधुनिक वाहन चालवण्यासाठी अग्निशमन दलातील २० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. फिनलँड येथील `ब्रॅन्टो` या कंपनीकडून हे वाहन खरेदी करण्यात आले आहे. १६ मे रोजी या वाहनाचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.

...ही आहेत वैशिष्ट्ये
१) टर्न टेबल लॅडर वाहनाप्रमाणे एरियल लॅडर प्लॅटफॉर्ममध्ये शिडी नाही, तर हायड्रॉलिक खांब आहे. हा खांब सरळ वर जाऊन वरचा १५ मीटरचा भाग हव्या त्या कोनात वाकू शकतो. त्यामुळे या वाहनाला टर्न टेबलपेक्षाही कमी जागा लागते.
२) या वाहनाचा आर्म केवळ ९० मीटर उंचच नाही तर ३० मीटर खोलपर्यंतही पोहोचू शकतो. म्हणजेच या वाहनाद्वारे टोलेजंग इमारतीमधील नागरिकांची सुटका तर होतेच, शिवाय ३० मीटर खोल दरीत अडकलेल्यांची सुटका होऊ शकते.
३) या वाहनाच्या खांबालाच पाण्याचा पाईपही बसविण्यात आला असून, स्वतंत्र पाईप सोबत नेण्याची आवश्यकता नसते. आवश्यक त्या उंचीपर्यंत पोहोचल्यानंतर हा पाईप ३० मीटर लांबपर्यंत दाबाने पाणी फेकू शकतो. शिवाय उंचीवर हवेच्या झोतातही हा खांब स्थिर राहू शकतो.

आणखी वाहने मागवणार
महापालिकेच्या ताफ्यात दोन रेस्क्यू व्हॅन आहेत. या व्हॅनमध्ये रसायनामुळे, शॉर्टसर्किटमुळे अथवा तेलापासून लागणारी सर्व प्रकारची आग विझविण्यासाठी लागणारे साहित्य सुसज्ज ठेवण्यात येत असते. महापालिकेने आणखी नऊ वाहनांची मागणी नोंदवली आहे. यात सुमारे १४ हजार लिटर पाणी आणि फोम वाहून नेण्याची क्षमता असलेले २ वॉटर बाऊजर, ३ वॉटर टेंडर आणि ४ मिनी वॉटर टेंडरचा समावेश आहे. येत्या सहा महिन्यांत ही वाहने अग्निशमन दलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81415 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top