ठाणे प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे प्रतिक्रिया
ठाणे प्रतिक्रिया

ठाणे प्रतिक्रिया

sakal_logo
By

सर्वसामान्यांना चटके
महागाईचेच `अच्छे दिन`

देशातील सर्वसामान्य नागरिक पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सामना करत असताना घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही ५० रुपयांची वाढ झाली आहे. मोदीपूर्व काळात ४०० ते ५०० च्या घरात असलेला हा सिलिंडर आता तब्बल १००० रुपयांना झाला आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट आधीच शेवटच्या घटका मोजत असताना, सिलिंडरच्या दरवाढीने सर्वसामान्यांना आणखी झटका बसला आहे. महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतच असल्याने केंद्रातील भाजप सरकारच्या काळात सर्वसामान्यांऐवजी महागाईलाच `अच्छे दिन` आले आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.
--------------

वाढती महागाई चिंतेची बाब ठरत आहे. याआधीच काटकसरीत घर चालविताना नाकी नऊ येतात. त्यात सिलिंडरचे दर वाढल्याने पुढे कठीण होणार आहे. वित्तीय तूट दाखवून सरकार जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमती वाढवते. आता या सरकारचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे.
- कांचन कुलकर्णी, कल्याण. 

महागाई वाढते, मात्र घरातील मासिक उत्पन्न वाढत नाही. प्रशासन चालवणाऱ्यांनी आता निरर्थक विषयांवर राजकारण करणे सोडून सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे. सिलिंडरसह इतर जीवनावश्यक गोष्टींचे दर असेच वाढत राहिले तर मध्यमवर्गीय गरिबीच्या खाईत लोटले जातील.
- सविता शिंपी, ठाणे.

कोरोनाकाळात आलेला आर्थिक बोजा आजतागायत कायम आहे. काही केल्या वस्तूंच्या किमती कमी होत नाहीत. सिलिंडर, इंधनाची तर वारंवार दरवाढ होते. परिस्थिती हलाखीची आहे. स्वयंपाक घरात गॅस वापरताना दहा वेळा विचार करावा लागतो.
- मनीषा होनखांडे, वसई.

गेल्या काही महिन्यांपासून महागाईचा भडका उडाला आहे. सिलिंडरचे दर वाढल्याचा परिणाम सर्वच बाबींवर होतो. ही दरवाढ अन्यायकारक आहे. सरकारने याचा गांभीर्याने विचार करून दरकपात करून, सर्वसामान्यांना तातडीने दिलासा द्यावा.
- किरण गेडाम, भाईंदर.

गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळते ती १०० टक्के नागरिकांपर्यंत पोहचते का? गेल्या अनेक वर्षांपासून ती बंद आहे. आमच्याच खिशातून घेऊन आम्हालाच परत करण्यापेक्षा सबसिडी देऊच नका. निदान दोनशे तरी कमी होतील आणि दरवाढीचा प्रश्नच उद्‌भवणार नाही.
- रेश्मा रुपनर, कल्याण.

जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले असतानाच सिलिंडरचे दर वाढल्याने आर्थिक बजेट शेवटची घटकाच मोजत आहे. पूर्वी मिळणारी सबसिडीदेखील सरकारने बंद केली आहे.
- पल्लवी सर्जीने, अंबरनाथ.

सरकारने सिलिंडरसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवल्याने महिन्याची सगळी आर्थिक गणिते बिघडली आहेत. आवश्यक गरजेच्या गोष्टींवरही मुरड घालण्याची वेळ या फसव्या आणि कर्मदरिद्री सरकारने आणली आहे. 
- अनंता ढोणे, शहाड.

गॅस सिलिंडरचे दर सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांवर मोठा बोजा पडणार आहे. घराचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी गृहिणींवर असते. मात्र अशा पद्धतीने दर वाढत गेले तर संपूर्ण आर्थिक गणित कोलमडणार आहे. एकंदर महागाई नियंत्रणात आणण्याची आवश्यकता आहे.
- स्नेहल पवार, भाईंदर.

पेट्रोल, डिझेल, सिलिंडरसह १४३ जीवनावश्यक वस्तूंचे दरवाढ केल्याने तुटपुंज्या वेतनात घर चालविणे तारेवरील कसरत ठरत आहे. सगळी सोंगे आणता येतात, मात्र पैशांचे सोंग घेता येत नाही, हे `सोंगाड्या` सरकारमध्ये बसलेल्यांना कळतेय, पण वळत नाही.  
- योजना संगारे, आंबिवली.

सरकारने सिलिंडरचे दर जरूर वाढवावेत, पण सोबतच चुली लावण्यासाठीही भूखंडाचे आरक्षण जाहीर करून सार्वजनिक चूल बांधून द्यावी. रेशन कार्डवर चूल पेटविण्यास लाकडे व काडीपेटी उपलब्ध करून द्यावी, निदान या महागाईत गरिबांना तरी जगता येईल. 
- उषा मोरे, कल्याण. 

सिलिंडरचे दर सातत्याने वाढत आहेत. काटकसर तर दूरचीच बाब, खर्चाचा बोजाच अधिक झाला आहे. सरकारने आतातरी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला पाहिजे.
- विजया मुळे, नालासोपारा.

प्रत्येक वस्तूच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पैशांची आवक कमी व खर्च अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू केला आहे. आम्ही जगायचे कसे?
- परीन शेख, विरार.

सध्या जीवनावश्यक सर्वच वस्तूंचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची अक्षरशः पिळवणूक सुरू आहे. सिलिंडरचे दर वाढल्यामुळे घराचे आर्थिक बजेट सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते.
- मोहिनी मोरे, ठाणे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81416 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top