शहरात मियावाकी जंगल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात मियावाकी जंगल
शहरात मियावाकी जंगल

शहरात मियावाकी जंगल

sakal_logo
By

वाशी, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने पर्यावरणशील शहर निर्मितीकरिता कंबर कसली असून शहरात वृक्षारोपण व संवर्धनाकडे विशेष लक्ष दिले आहे. मागील दोन वर्षांत २ लाख २२ हजार रोपांची लागवड करण्यात आलेली आहे. या वृक्षारोपणाचा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आढावा घेत आगामी एक महिन्याच्या मान्सूनपूर्व कालावधीत मियावाकी पद्धतीने नियोजित ६० हजार वृक्षरोपांची लागवड पूर्ण करावी, तसेच या वर्षात इतर २० हजार वृक्षरोपांची लागवड करावी, असे निर्देश उद्यान विभागाला दिले आहेत.

ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे साकारल्या जात असलेल्या मियावाकी स्वरूपाच्या शहरी जंगलामधून फिरण्याचा अनुभव नागरिकांना घेता यावा, या दृष्टीने त्या ठिकाणी पदपथ तयार करण्यात येत आहे. या पदपथांचे, तसेच ध्यान केंद्राचेही काम लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. मियावाकी वृक्षलागवड ही पावसाळ्याव्यतिरिक्त कालावधीत करावी लागते, ही बाब लक्षात घेऊन नियोजित केलेली ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे अधिक ४८ हजार, तसेच सीबीडी बेलापूर येथील नागा गणा पाटील उद्यान येथे ८ हजार, उर्वरित ५६ हजार वृक्षलागवड पावसाळ्यापूर्वी मे महिन्यातच पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

या वर्षी ज्वेल ऑफ नवी मुंबई या एकाच ठिकाणी मियावाकी पद्धतीने १ लाख वृक्षारोपांच्या शहरी जंगल निर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे. हा सद्यस्थितीतील देशातील सर्वात मोठा मियावाकी पतीचा शहरी जंगल प्रकल्प असणार आहे. या १ लक्ष वृक्षरोपांपैकी ६८ हजारांहून अधिक वृक्षरोपांची लागवड पूर्ण करण्यात आलेली आहे. याची माहिती घेत आयुक्तांनी उर्वरित वृक्षलागवडीचे काम मे महिन्यातपूर्ण करण्याचे निर्देश उद्यान विभाग व ग्रीनयात्राच्या प्रतिनिधींना दिले.

देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड
करवंद, तगर, अडुळसा, निंब, खैर, बेल, लिंब, कांचन, आपटा, उंबर, खैर, अशोक, बदाम, बोर, अंजन, बहावा, कोकम, जांभूळ, मोह, बकुळ, करंज, रिठे, काजू, चिंच, आवळा, वड, पिंपळ, सोनचाफा, आंबा, कदंब, साग, सरस अशा मियावाकी पद्धतीने ६० हून अधिक देशी वृक्ष प्रजातींची लागवड करण्यात येणार आहे.

पैसे, पाण्याची बचत
ग्रीन यात्रा संस्थेच्या माध्यमातून मियावाकी शहरी जंगल निर्मितीचे काम सीएसआर निधीतून करण्यात येत असल्याने महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे. या झाडांचे तीन वर्षांचे संगोपन व संवर्धनही संस्थेमार्फत केले जात आहे. त्यासाठीही महापालिका कोणत्याही प्रकारचा मोबदला संस्थेस देत नाही. महापालिकेच्या अत्याधुनिक सी टेक तंत्रज्ञानावर आधारित मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत पाणी वापरले जात आहे.

पक्षी, प्राण्यांचा अधिवास वाढणार
मियावाकी पद्धतीने लागवड केलेली झाडे नियमित वृक्षरोपांपेक्षा झपाट्याने वाढत असल्यामुळे या मियावाकी शहरी जंगलांमध्ये विविध पक्षी, प्राणी यांचा अधिवास वाढून नवी मुंबईच्या जैवविविधेतही लक्षणीय भर पडत आहे.

लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण
नवी मुंबई पालिकेने २०२१ मध्ये शहरात एक लाखाहून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे. २०२२ वर्षामध्येही शहरात एक लाख चार हजारपेक्षा अधिक वृक्षरोपांची मियावाकी पध्दतीने लागवड करण्यात आलेली आहे. यामध्ये कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानात मियावाकी जंगलात २० हजार, तसेच विविध ठिकाणी ३० हजार आणि मोरबे धरण प्रकल्पस्थळी ४० हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81420 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top