
प्रवासी भाडे दरवाढीचे संकट!
कल्याण, ता. ७ (बातमीदार) ः पेट्रोल, डिझेल, तसेच सीएनजीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सरकारने रिक्षा, टॅक्सीचे भाडे दर वाढवावेत, अशी मागणी रिक्षा टॅक्सी महासंघाकडून करण्यात आली आहे. एक जूनपूर्वी भाडेवाढ केली नाही तर कल्याणसह कोकणातील रिक्षा-टॅक्सी चालक संपावर जातील, असा इशारा कोकण विभाग अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी दिला आहे.
कोरोना प्रादुर्भावानंतर महागाईसोबत इंधन दरवाढ झपाट्याने होत आहे. मात्र, रिक्षा-टॅक्सी चालकांचे भाडे तसेच आहे. या वाढत्या महागाईमध्ये रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ होणे गरजेचे आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कल्याणमध्ये रिक्षांचे १ मार्चपासून तीन रुपयांनी भाडेवाढ जाहीर केली होती. मात्र, ती चार ते पाच वर्षांपूर्वीचा विचार करता पुरेसी नाही, असे मत रिक्षा-टॅक्सी चालक सांगत आहेत.
रिक्षा अथवा टॅक्सी खरेदी करून प्रवासी वाहतूक करताना सरकारने भरमसाठ शुल्क वाढ केली आहे. त्यात गेल्या महिनाभरात सीएनजी इंधनात प्रतिकिलो १४ रुपये दरवाढ झाली आहे. पेट्रोल तर ११० रुपये लिटर आणि डिझेलदेखील १०० रुपयांच्या जवळ पोचले आहे. त्यात ऑईल, टायर, ट्यूब, पंक्चर काढण्याच्या दरामध्ये प्रतिदिन वाढ होत आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सीची दरवाढ होणे गरजेचे आहे, असे रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून सांगण्यात येत आहे. एक जूनपूर्वी किमान चार ते पाच रुपये भाडेवाढ द्यावी, अन्यथा एक जूनपासून कल्याणसहित सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यातील रिक्षा-टॅक्सी चालक बंदमध्ये सहभागी होतील, असा इशारा रिक्षा-टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी सरकारला दिला आहे.
भाडेवाढीचा विषय अजेंड्यावर
१९ मे रोजी एमएमआरटीएची बैठक होणार आहे. या बैठकीत रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा विषय अजेंड्यावर आहे. या बैठकीत हा विषय मंजूर झाला तर किमान तीन रुपये भाडे निश्चित होईल, असे सांगितले जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81426 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..