
`जननी आशीष`, अनाथांचे आधारवड
पूजा पवार : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : मुलांचे संगोपन करणाऱ्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा दिन अर्थात ‘जागतिक मातृदिन’ उद्या (८ मे) सर्वत्र साजरा होणार आहे. आई-वडिलांच्या कुशीत जाते तेच खरे बालपण असते; मात्र कित्येक मुलांच्या नशिबी असे बालपण येत नाही. रस्त्याच्या कोपऱ्यावर किंवा कचराकुंडीजवळ फेकून दिलेल्या या निष्पाप कोवळ्या जीवांना मायेच्या ओलाव्याशिवायच अनेकदा जीवन व्यतीत करावे लागते. तेव्हा समाजाने आणि जन्मदात्या आई-वडिलांनी सोडून दिलेल्या समाजातील अनाथ मुलांना हक्काचे छप्पर देऊन त्यांचे संगोपन आणि मायेचा ओलावा देण्याकरिता मागील २९ वर्षांपासून डोंबिवली येथे ‘जननी आशीष’ संस्था कार्यरत आहे. समाजाप्रती आपलेही काही देणे लागते, या विचाराने प्रेरित होऊन डोंबिवलीतील २१ महिलांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली. आता ही संस्थाच अनाथ मुलांचे आधारवड बनली आहे.
१९९३ मध्ये डोंबिवलीतील डॉ. कीर्तिदा प्रधान यांच्यासह २१ मध्यमवर्गीय महिलांनी एकत्र येत समाजातील अनाथ मुलांच्या संगोपनासाठी काम करावे, या प्रेरणेने जननी आशिष संस्थेची स्थापना केली. ठाणे जिल्ह्यातील अनाथ मुलांसाठी काम करणारी ही पहिली संस्था असून, अनाथ मुलांच्या भविष्यासाठी त्यांना हक्काचे कुटुंब मिळावे याकरिता त्यांना दत्तक देण्याचे काम ही संस्था पाहते. रस्त्याच्या कडेला, निर्जनस्थळी जन्मदात्या आई-वडिलांनी सोडून दिलेल्या चिमुकल्या जीवांना पोलिसांकडून संस्थेत आणले जाते. तसेच कुमारिका मातेच्या मुलांचाही सांभाळ या संस्थेमार्फत केला जातो.
जननी आशीष संस्थेमध्ये अनाथ मुलांना हक्काचे छप्पर देऊन त्यांच्या कौशल्य विकास तसेच शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जातात. संस्थेचे दैनंदिन कामकाज, मुलांची काळजी घेणे, मुलांची शिकवणी, आरोग्याची काळजी घेणे आदींसाठी २० महिला संस्थेमध्ये कार्यरत आहेत. १९९३ मध्ये एका अनाथ बालिकेचा सांभाळ करण्यापासून सुरू झालेला संस्थेचा प्रवास आज एक हजार ३०० मुलांच्या पुनर्वसन आणि संगोपनापर्यंत पोहोचला आहे. मागील २९ वर्षांत जननी आशीष संस्थेने १ हजार ३०० मुलांचे संगोपन केले असून यातील ६०० मुलांना शासनमान्य दत्तक प्रक्रियेतून संस्थेने हक्काचे कुटुंब आणि आई-वडील मिळवून दिले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81441 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..