
कधी मैत्रिण, तर कधी शिस्तप्रिय `आई`
कधी मैत्रीण, तर कधी शिस्तप्रिय `आई`
आई आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती आपल्याला मार्गदर्शन करत असते. कधी मैत्रीण, तर कधी शिस्तप्रिय आई, अशा अनेक भूमिका ती उत्तमरित्या साकारते. आज ८ मे अर्थात `जागतिक मातृदिन`. या विशेष दिवसानिमित्त `सेलिब्रेटींनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आपल्या निखळ विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे हिनेही आईबद्दलचे मत मांडले आहे...
आईबद्दल आपण दोन मिनिटे बोलू शकत नाही. आईचे वर्णन आपण दोन शब्दांमध्येही मांडू शकत नाही. माझा प्रत्येक श्वास तिच्या असण्यावर अवलंबून आहे. आमच्या दोघींचे इतके घट्ट बॉण्डिंग आहे. बऱ्याचदा काही जण आपल्या आईच्या जवळ नसतात. त्यांचे त्यांच्या बाबांसोबत, मावशीसोबत वा बहिणीसोबत जास्त चांगले बॉण्डिंग असते; आमच्या कुटुंबामध्ये मात्र सगळ्यांचे माझ्या आईसोबत खूप चांगले बॉण्डिंग आहे. ती प्रत्येकाच्या आयुष्यातील मार्गदर्शक आहे.
माझ्यासाठी माझी आई मैत्रीण, बहीण, उत्तम मार्गदर्शन करणारी व्यक्ती आहे. माझी आई अतिशय सकारात्मक आहे. ती अनेक आजारांपासून ग्रस्त आहे; मात्र ती नेहमीच या सगळ्यांबाबत अतिशय सकारात्मक असते. तिचा उत्साह आणि सकारात्मकता बघून तरुण वयातील मुलांनाही लाज वाटेल. सकारात्मकतेचा चेहरा असेल तर ती माझी आई आहे. क्षणोक्षणी मला तिचे मार्गदर्शन लाभले आहे. जेव्हा एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये समोरचा मार्ग दिसत नाही, तेव्हा मी नेहमी आईला फोन करते आणि तिने दिलेले मार्गदर्शन मला नेहमीच उपयोगात येते. ती इतक्या उत्तमरित्या माझा मार्ग मोकळा करून देते, की ती समस्या कधी निघून जाते, हेच समजत नाही.
आम्हा दोघींना एकत्र कॉफी प्यायला, शॉपिंग करायला खूप आवडते. माझी आई मला नेहमीच सांगते की, तू माझ्यामधले सगळे चांगले गुण घेतले आहेस, तसेच तू काही वाईट गुणही घेतले आहेस, ते वाईट गुण तुझ्याकडे टिकू देऊ नकोस. मी जसे माझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले तसे तू तुझ्या तब्येतीसोबत करू नकोस. तू स्वतःची काळजी घेत जा. हे ती नेहमीच मला सांगत असते.
चांगले करण्याचा आत्मविश्वास
भरमसाट पैसा असला म्हणजे समोरच्या व्यक्तीला आनंदी ठेवता येते, असे नाही. आपण त्यांच्यासोबत दोन चांगल्या गोष्टी बोललो तरीही समोरचा आनंदी होतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये गळून न पडता ठामपणे उभे राहून स्वतःवर विश्वास ठेवून सगळे काही चांगले करण्याचा आत्मविश्वास तिच्यामध्ये आहे आणि तिची हीच गोष्ट मी माझ्यामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करीन, असे श्रेया सांगते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81447 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..