कर्तव्य बजावत कराटेत सुवर्ण भरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्तव्य बजावत कराटेत सुवर्ण भरारी
कर्तव्य बजावत कराटेत सुवर्ण भरारी

कर्तव्य बजावत कराटेत सुवर्ण भरारी

sakal_logo
By

वसंत जाधव ः नवीन पनवेल
पोलिस दलातील नोकरी म्‍हणजे २४ तास तणाव. सार्वजनिक सुटी असो, निवडणुका असोत, वा बंदोबस्‍त; कायम सतर्क राहावे लागते. मात्र त्‍यातूनही वेळ काढून आपली आवड जोपासत मयुरी खरात यांनी राज्‍य, राष्‍ट्रीय पातळीवर विविध स्‍पर्धांमध्ये सहभागी होत उल्‍लेखनीय कामगिरी करून वेगळा ठसा उमटवला आहे.

नवी मुंबई पोलिस दलात २०१० मध्ये भरती झालेल्या मयुरी खरात यांचे शालेय शिक्षण कळंबोली येथील सुधागड हायस्कूलमध्ये झाले. शालेय जीवनापासून त्‍यांना खेळात रुची होती. त्‍यांनी विविध क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवले आहे; परंतु मयुरी यांचा कल होता कराटेमध्ये. त्‍यामुळे कराटेमध्येच करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
पोलिस दलात सामील झाल्यानंतर त्यांनी खेळात भाग घ्यायचे ठरवले होते; परंतु कराटे हा क्रीडा प्रकार पोलिस दलातील खेळांमध्ये नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती; परंतु पोलिस दलामध्ये २०१८ मध्ये कराटे खेळाचा समावेश करण्यात आला आणि खऱ्या अर्थाने मयुरी यांच्या कराटेमधील आपली गुणवत्ता सिद्ध करता आली.
पोलिस दलात भरती होण्यापूर्वी पनवेलमधील नावाजलेले कराटे प्रशिक्षक आंतरराष्‍ट्रीय कराटे पंच सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कराटेचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी कराटेमध्ये प्रावीण्य मिळवले असून अनेक पदके मिळवली आहेत. कोरोना काळात निर्बंध शिथिल झाल्यानंतर कळंबोली येथील पोलिस मुख्यालयात त्यांनी संपत्ती येळकर यांचे प्रशिक्षण लाभले.
कळंबोली पोलिस ठाण्यातच कर्तव्यावर असल्याने घर आणि नोकरी सांभाळून मयुरींना कराटेचा कसून सराव करण्यास पुरेसा वेळ मिळतो. अलिकडेच घाटकोपर येथे झालेल्या महाराष्ट्र पोलिस तायक्वंडो निवड चाचणी स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात त्‍यांनी अहमदनगरच्या कोमल यांना पराभूत करून सुवर्णपदक पटकावले आणि नवी मुंबई पोलिस दलाची मान अभिमानाने उंचावली.

कुटुंब, सहकाऱ्यांचे पाठबळ महत्त्‍वाचे
जम्मू काश्‍मीर येथे होणाऱ्या पोलिस नॅशनल गेम्स स्पर्धेसाठी मयुरी यांची निवड झाल्याने नवी मुंबई पोलिस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी अभिनंदन केले आहे. प्रशिक्षक व कुटुंबाचे पाठबळ तसेच कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील व सहकारीवर्गाच्या सहकार्यामुळेच कराटेवर लक्ष केंद्रित करता येत असून उत्‍कृष्‍ट कामगिरी करण्यास प्रोत्‍साहन मिळत असल्‍याचे मयुरी सांगतात.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81452 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top