मातृदुग्धपेढीने थांबली नवजीवांची परवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मातृदुग्धपेढीने थांबली नवजीवांची परवड
मातृदुग्धपेढीने थांबली नवजीवांची परवड

मातृदुग्धपेढीने थांबली नवजीवांची परवड

sakal_logo
By

राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ७ : प्रसूतीनंतर मातेला येणाऱ्या स्तनपानातील अडचणी, काही वैद्यकीय कारणास्तव होणारे मृत्यू अशा अनेक कारणांमुळे मातृदुधासाठी तहानलेल्या बाळांना अन्न पुरविणाऱ्या कळवा रुग्णालयातील दुग्धपेढीतील दुधाचे प्रमाण मागील १० वर्षांपासून वाढल्याचे सकारात्मक चित्र आहे. त्यामुळे आईच्या दुधाच्या प्रतीक्षेत असलेल्या नवजात कोवळ्या जिवांची होणारी परवड आता ‘तिच्या’मुळे काही अंशी कमी झाली आहे. मातृदुग्ध पेढीत दुधाचे संकलन व्हावे, यासाठी प्रसूती झालेल्या मातांची रुग्णालय प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येते. त्यातूनच दररोज ३०० ते ४०० मिलिलिटर दुधाचे संकलन या मातृदुग्ध पेढीत केले जाते.

सुरुवातीचे सहा महिने बाळाचे पोषण हे संपूर्ण आईच्या दुधावर अवलंबून असते; मात्र अनेक नवजात बालकांना त्यांच्या मातेचे दूध मिळत नाही. विशिष्ट कारणांमुळे स्तनपानात मातेला येणाऱ्या अडचणी, मातेचा होणारा मृत्यू यामुळे आईच्या दुधाची प्रतीक्षा करणाऱ्या बाळांसाठी मातृदुग्ध पेढीची व्यवस्था करण्यात आली आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात ही मातृदुग्ध पेढी मागील १० वर्षापासून कार्यरत आहे; परंतु संपूर्ण जिल्ह्यातून दुधाची मागणी असल्याने दुग्धपेढीतील साठा अपुरा पडत होता.
याची गांभीर्याने दाखल घेत रुग्णालय प्रशासनाने मातृदुग्ध पेढीचे नियोजन आखण्यास सुरुवात केली. त्यानुसार पेढीत काम करण्याची जबाबदारी डॉक्टर, परिचारिकांवर सोपविण्यात आली. त्यांच्याद्वारे प्रसूत झालेली महिला तसेच तिचे कुटुंबीय यांचे समुपदेशन केले जाते. यामुळे रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर स्वेच्छेने पेढीत दुग्धदान करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. हा उपक्रम सुरू करण्यापूर्वी दर दिवशी अवघ्या २५० मिलिलिटर दुधाची नोंद होत असताना आता, मात्र दरदिवशी ३०० ते ४०० मिलिलिटर दूध जमा होत असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. वंदना कुमावत यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात एकमेव दुग्धसंकलन बँक ही कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आहे. आजही अनेक वेळा आईचे दूध मिळत नसलेल्या नवजात बालकांना डबाबंद पावडरचे दूध दिले जाते; पण याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या अनेक जण मातृदुग्ध पेढीच्या माध्यमातूनच बालकांना दूध देण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या पाच महिन्यांत ५४३ मातांच्या दुग्धसंकलनामुळे २९६ बालकांना ही मातृदुग्धपेढी मोठा आधार ठरली आहे.

कोरोनात खरा आधार
१) कोरोना काळात नवजात अर्भकांच्या दुधाचा प्रश्नही समोर आला. अनेकदा मातेची प्रकृती चांगली नसल्याने ती आपल्या बाळाला दूध देऊ शकत नव्हती. तसेच काही स्तनदा मातांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने त्यांच्या बालकांना दूध कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. आईचे दूध मिळविण्यासाठी ठाणे-मुंबईसह अनेक मातृदुग्ध पेढ्यांमध्ये प्रयत्न करूनही दूध मिळत नव्हते.
२) कळवा रुग्णालयात मातृदुग्ध पेढी असली, तरी येथे दाखल मातांच्या बालकांनाच ती उपलब्ध करून देण्याचा नियम होता; परंतु कोरोना काळात इतर ठिकाणी असलेल्या गरजू बालकांनाही येथील दुग्धपेढीची संजीवनी देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना काळात कळवा रुग्णालयातील चार स्तनदा मातांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या नवजात बालकांना आवश्यक असलेले आईचे दूध या रुग्णालयातील मातृदुग्ध पेढीच्या माध्यमातून देण्यात आले.

ठाणे जिल्ह्यातील खासगी आणि इतर महापालिका क्षेत्रात मातृदुग्ध पेढी सुरू करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक महापालिकेत एक मातृदुग्ध पेढी कार्यरत झाल्यास ज्या नवजात बालकांना दुधाची आवश्यकता आहे, त्यास ते उपलब्ध होऊन बालकांचे दुधाअभावी होणारे मृत्यू रोखण्यास मदत होणार आहे.
- डॉ. वंदना कुमावत, बालरोगतज्ज्ञ, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय

गेल्या पाच वर्षांतील आढावा (मिलिलिटरमध्ये)
वर्ष दूध संकलन दुधाचे वितरण दुग्धदाते लाभार्थी
२०१७ ४३२९० ३५१२५ ८३४ ११४
२०१८ १२३४९५ १०५५३५ १४७८ २५६
२०१९ १७४९३५ १५८८३० १४५८ ३२७
२०२० १३४८५० १२३७९० ९१५ ३६१
२०२१ १४४६९० १३३५६० ५८४ ९९५

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81456 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top