
१८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण
नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : पावणे एमआयडीसीतील वेस्ट कोस्ट पॉलिकेम प्रा.लि. या रबर बनवणाऱ्या कंपनीत शुक्रवारी दुपारी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतर शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आणली; मात्र या आगीत वेस्ट कोस्ट पॉलिकेम कंपनीतील मॅनेजर आणि अभियंता या दोघांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
शुक्रवारी दुपारी लागलेली आग केमिकल व रबर असल्याने संपूर्ण कंपनीत पसरली. त्यानंतर सदरची आग बाजूच्या मे. हिंद इलास्टोमर्स या रबर बनविणाऱ्या कंपनीसह इतर दोन कंपन्यामध्ये पसरली. या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी येथील कंपनीत अडकून पडलेल्या तीन कामगारांना बाहेर काढून त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र दोघेजण आत अडकून पडले होते.
अथक प्रयत्नांती आग आटोक्यात
आग आटोक्यात आणण्यासाठी नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्या वाशी, नेरूळ, कोपरखैरणे, ऐरोली, सीबीडी येथील १२ तसेच सिडकोच्या उलवे, खारघर व ओएनजीसी, ठाणे महापालिका अग्निशमन दलाचे मिळून एकूण २५ फायर टेंडर आग विझविण्याचे काम अहोरात्र करत होते. फायर टेंडर आगीवर नियंत्रण मिळविण्यासह फोमच्या सहाय्यानेदेखील आग रोखण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येत होता. त्यासाठी फोमच्या २०० ड्रमचा वापर करून शनिवारी सकाळी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सदर आगीचा भडका पुन्हा उडू नये म्हणून घटनास्थळी कूलिंगचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट
आगीत कंपनीचे मॅनेजर एन. एस. नायर (६५) हे कंपनीच्या टेरेसवर मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा आगीमुळे निर्माण झालेल्या धुरात गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे; तर याच कंपनीचे अभियंता निखिल पाशिलकर (२५) हे दुसऱ्या मजल्यावर बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आल्याने त्यांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळी बाहेर काढले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81464 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..