
दिशादर्शक फलकांमुळे १५० कोटींचा चुराडा?
मुंबई, ता. ७ ः मुंबईतील रस्त्यावर वाहतूक सुविधेसाठी दिशादर्शक फलकाच्या निविदांमध्ये ठराविक कंत्राटदाराला झुकते माप देण्याचा आरोप केला जात आहे. या कंत्राटामुळे मुंबई महापालिकेचा १५० कोटी रुपयांचा चुराडा होईल, तर महापालिकेने प्रभागस्तरावर हे काम केल्यास पालिकेचा निम्मा खर्च वाचू शकतो, असेही सांगण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेच्या नामफलकाच्या कंत्राटासाठी ठराविक कंत्राटदाराला लाभदायक होईल अशी निविदा प्रक्रिया होत असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित त्यांनी ही निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील विविध मार्गांवर दिशादर्शक फलकांसाठी १५० कोटींची निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. निविदेतील निश्चित करण्यात आलेल्या अटी व शर्ती या आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर यांना लाभ होणाऱ्या असल्याचे गलगली यांचे म्हणणे आहे. अशा पद्धतीने कंत्राट दिल्यास यात पालिकेचे नुकसान होणार असल्याचे पत्र गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्तांना पाठविले आहे. त्यासोबतच पैसे वाचवण्याचा उपायही त्यांनी महापालिकेला सुचवला आहे.
मुंबई महापालिकेने दिशादर्शक फलकांची निविदा देण्याचे काम प्रभाग स्तरावर केल्यास पालिकेचे ७५ कोटी वाचतील, असा अनिल गलगली यांचा दावा आहे.
----
निविदांतील अटी व शर्ती बदला
सदर कामाच्या निविदांसाठी निश्चित करण्यात आलेल्या अटी व शर्तींमुळे काही विशिष्ट कंत्राटदारांनाच लाभ होत आहे. अशीच पद्धत सुरू राहिल्यास ठराविक कंत्राटदारांची मक्तेदारी निर्माण होईल आणि पात्र बोलीदारांच्या संख्येत कपात होईल. संबंधित महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारातील संगनमत तोडण्यासाठी स्पर्धा होणे आवश्यक आहे. त्यामुळे निविदांमधील अटी व शर्ती बदलण्याची मागणी गलगलींनी पत्रात केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81476 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..