
एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : राज्याच्या इलेक्ट्रिक बस धोरणानुसार एसटीच्या ताफ्यातही इलेक्ट्रिक बसेस आपली प्रवासी सेवा देणार आहेत. ई-बसेस पुरवणाऱ्या कंत्राटदारांचा एसटी महामंडळाशी नुकताच करार झाला आहे. त्यानुसार १ जूनला एसटीच्या वर्धापनाच्या मुहूर्तावर इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. वाहतूक उप महाव्यवस्थापक यामिनी जोशी यांनी औरंगाबाद येथे ११ मे रोजी दोन दिवसीय आढावा बैठक आयोजित केली असून, यामध्ये मुख्यतः मराठवाडा, विदर्भातील इलेक्ट्रिक बसेसच्या मार्गाचे नियोजन केले जाणार आहे.
इलेक्ट्रिक बसेसचे थांबे, सोयीस्कर असलेले लांब मार्ग, चांगले रस्ते शोधणे, चार्जिंग पॉईंट उभारणी असा डिटेल्स रिपोर्ट तयार करण्यासाठी या आढावा बैठकीत काम केले जाणार आहे. यामध्ये संबंधित वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मराठवाडा, विदर्भातील विभाग नियंत्रकसुद्धा उपस्थित राहणार आहेत. इलेक्ट्रिक बस सुरू करण्यासंदर्भातील सर्वच गोष्टींची चाचपणी या बैठकीत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १५० बसेस एसटीच्या ताफ्यात येणार आहेत. त्यापैकी ५० बसेस जुलै महिन्यापर्यंत दाखल होणार आहेत; तर उर्वरित १०० बसेस सप्टेंबरपर्यंत येणार असल्याने त्यापूर्वीच एसटी प्रशासनाला इलेक्ट्रिक बसेसचे नियोजन करावे लागणार आहे.
एसटीत सध्या सुमारे १४ हजार बसेस आहेत. त्यामध्ये आता सुमारे १५०० इलेक्ट्रिक बसेस, तर ८ वर्षे जुन्या झालेल्या बसेसचे रूपांतरण करून सीएनजी बसेस सुद्धा प्रवासी सेवा देणार आहेत. त्यामुळे सवलतीच्या दरात एसटीचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखद होणार असल्याचा विश्वास एसटी प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81479 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..