
विरोधकांना संपवत शिवसेना पुढे गेली
मुंबई, ता. ७ ः काही क्षण असे असतात की त्या काळात आपण जातो आणि शब्द सुचेनासे होतात. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाची झलक बघताना शिवसेना म्हणजे काय आहे, शिवसैनिक म्हणजे काय आहे हे कळते. गुरू आणि शिष्याचे नाते जपणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यावरील चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. शिवसेना संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना संपवून शिवसेना पुढे गेली, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
आनंद दिघेंची निष्ठा काय आहे हे लोकांना चित्रपटाद्वारे कळेल. दिघेंनी अनेकांना जपले, पण बाळासाहेबांचा वक्तशीरपणा या गुणामुळेच आनंद दिघेंसारखे अनेक शिवसैनिक घडले. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या नावापुढे ठाणेकरांचे हृदय अशी ओळ असायला हवी होती. दिघेंवर चित्रपट काढत त्यांचे कार्य पुढे नेणे ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे; तर आनंद दिघेंच्या भूमिकेत प्रसाद ओक हे आहेत. या ट्रेलर लॉन्चच्या सोहळ्याला मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री बच्चू कडू, खासदार हेमंत पाटील, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, संजय राऊत, आमदार रवींद्र फाटक, खासदार गजानन कीर्तीकर, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आमदार सुनील शिंदे, वरुण सरदेसाई, अभिनेता जॅकी श्रॉफ, रितेश देशमुख, श्रुती मराठे, सुशांत शेलार, शर्मन जोशी, दिव्या दत्ता, गुलशन ग्रोवर, अमिषा पटेल, इशा कोप्पीकर उपस्थित होते.
---
या वेळी मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की आनंद दिघे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने प्रेरित होऊन सामान्य अडल्यानडलेल्यांना मदत केली. आजच्या कार्यक्रमाला हे सर्व लोक उपस्थित आहेत, याचे श्रेय दिघे यांच्या कार्याला जाते. दरम्यान, या चित्रपटाला दाक्षिणात्य दिग्दर्शक राजा मौली, अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा दिल्या.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81503 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..