
भाईंदर एसटी आगाराचे भिजत घोंगडे
भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : भाईंदर पश्चिम रेल्वेस्थानक परिसरात असलेले एसटी आगाराचे आरक्षण तात्काळ विकसित करण्यासंबंधीचे आदेश परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले आहेत. मिरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी या प्रश्नावर परिवहनमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे आदेश दिले, परंतु सुमारे दोन वर्षांपूर्वीदेखील परिवहन मंत्र्यांनी एसटी आगार उभारण्यासंबंधीचे आदेश दिले होते. मात्र या जागेत सीआरझेड आणि कांदळवन असल्यामुळे आगार विकसित करण्यासंबंधी कोणतीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे यावेळी तरी आगाराचा प्रश्न मार्गी लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाईंदर पश्चिम येथील ४९ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा एसटी आगारासाठी आरक्षित आहे आणि ही जागा एसटी महामंडळाच्या ताब्यात आहे. या जागेवर सीआरझेड आहे, तसेच अर्ध्याहून अधिक जागा कांदळवनाने व्यापली आहे. कांदळवन असलेल्या जागेत पाचशे मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नाही. त्यामुळे आजपर्यंत याठिकाणी आगार विकसित झालेले नाही. परिणामी या जागेत बेकायदेशीर खासगी बसगाड्या, टेम्पो उभे राहत असून गैरकृत्ये करणारे येथील काळोखाचा फायदा घेतात.
त्यामुळे या जागेत तातडीने एसटी आगार विकसित करण्यात यावे आणि आगार विकसित केल्यानंतर या जागेत मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस उभ्या करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार गीता जैन यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली होती. ही विनंती परिवहनमंत्र्यांनी तत्काळ मान्य करत या जागेवर आगार बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे, तसेच त्यासाठी वन विभागाकडून यासंबंधीची परवानगी मिळविण्याचे आदेशही संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे रखडलेल्या आगाराच्या बांधकामाला गती येईल, अशी माहिती आमदार गीता जैन यांनी दिली.
१) दोन वर्षांपूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील हे आगार विकसित करण्याची मागणी परिवहनमंत्र्यांकडे केली होती. त्यावेळीही यासंबंधीची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले होते; परंतु सीआरझेड आणि कांदळवन यामुळे हा प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे.
२) मासळी विक्रेत्यांना ही जागा तात्पुरती शेड बांधून देण्यात यावी, अशी मागणीही सरनाईक यांनी केली होती. मात्र त्यावरही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे परिवहनमंत्र्यांनी नुकत्याच दिलेल्या आदेशांवरदेखील कार्यवाही होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-----------------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81535 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..