
तलवारी घेऊन दहशत माजविणाऱ्या चार जणांना अटक
डोंबिवली, ता. ९ ः हातात उघड्या तलवारी, धारदार शस्त्र घेत रस्त्यात दिसेल त्याला मारहाण, बंद घरांच्या दरवाजावर शस्त्रांनी ठोकत दहिसर ठाकूरपाडा परिसरात काही तरुण मध्यरात्री दहशत माजवीत होते. याची माहिती मिळताच शीळ डायघर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दहशत माजविणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या असून एक जण फरारी झाला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे जावेद सलीम शेख ऊर्फ डीजे (३९), दिलावर ऊर्फ रुबेल फरीद शेख (वय २७), शाहीद नासीर शेख (वय २२) आणि साद अहमद ऊर्फ सोनू नासीर शेख (वय २४) अशी अटक आरोपींची नावे असून मारिया जावेद खान याचा पोलिस शोध घेत आहेत.
दहिसर ठाकूरपाडा परिसरात राहणारा डीजे, दिलावर, सोनू, शाहीद, साद आणि मारिया हे शुक्रवारी मध्यरात्री १२ ते ३ च्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी हातात उघड्या तलवारी व धारदार हत्यारे घेऊन फिरत होते. रस्त्यात दिसेल त्याला विनाकारण मारहाण करत बंद घरांच्या दरवाजांवर शस्त्रांनी बडवाबडव करीत लोकांच्या मालमत्तेचे नुकसान करीत होते. याची माहिती शीळ डायघर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस नाईक कृष्णा बोराडे यांच्या तक्रारीनुसार ५ जणांविरोधात शीळ डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मारियाचा शोध घेतला जात असल्याची माहिती शीळ डायघर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कापडणीस यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81628 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..