
दहशत माजवणाऱ्या `चंद्या`ला पोलिसी खाक्या
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ ः शेलारनाका परिसरात हातात चाकू घेत एक २० वर्षांचा तरुण काही नागरिकांशी वाद घालत होता. `सरक सरक...तेरे दुकान में, घर में घुसके मारुंगा`, असे तो धमकावत होता. त्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत पोलिसांपर्यंत पोहोचला आणि पोलिसांनी या चंद्या गुलकंद ऊर्फ चंद्रकांत गुलालकर (२०) याला थेट पोलिस कोठडीचा रस्ता दाखवला. चंद्या परिसरात दहशत माजवत होता. त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली.
डोंबिवलीमध्ये दादा, भाई यांची दहशत आजही पाहायला मिळते. यामध्ये चंद्यानेही आपले अस्तित्व तयार करण्यासाठी परिसरात चाकूचा धाक दाखवत धमकी देण्याचा प्रयत्न केला. शेलारनाका येथील एका चाळ परिसरातील एक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. यामध्ये चंद्या चाकूचा धाक दाखवत धमकाविताना दिसत होता. दोन-तीन तरुण त्याला अडविण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र त्यांनाही जीवे मारण्याची धमकी तो देत होता. चंद्याची ही दादागिरी एका तरुणाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आणि ती व्हायरल केली. रामनगर पोलिसांच्या हाती हा व्हिडीओ आला आणि घटनेचे गांभीर्य ओळखत त्यांनी तात्काळ चंद्याला पोलिस ठाण्यात पाहुणचारासाठी आणले.
सुटकेसाठी वसुली
रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. एक वर्षापूर्वी याच गुन्ह्यातून सुटकेसाठी त्याला ४० हजार रुपये लागले होते. त्या पैशांची वसुली करण्यासाठी २२ एप्रिलला चंद्याने फिर्यादीच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत खिशातून सहा हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर फिर्यादीने पुन्हा रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन चंद्या भाईविरोधात दहशत माजविणे व लूटमार करण्याची तक्रार केली होती. त्याचा पोलिस तपास करत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी चंद्याला बेड्या ठोकल्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81638 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..