
गुरे चोरणाऱ्या टोळीतील एकाचा मारहाणीत मृत्यू
माणगाव, ता. ९ (वार्ताहर) ः गुरे चोरून नेणाऱ्यांना जमावाने बेदम मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना माणगाव तालुक्यात घडली आहे. या घटनेत संतप्त जमावाने एक कारही पेटवली. याप्रकरणी १३ जणांवर माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील रवाळजे गावातील धरण परिसरात शनिवारी सकाळी ही घटना घडली. याबाबत पाटणूसचे पोलिस पाटील प्रदीप महिपत म्हामुणकर (५०, रा. म्हसेवाडी) यांनी माणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गुरांची चोरी करीत असल्याच्या संशयावरून माणगावात तीन अनोळखी व्यक्तींवर जमावाने हल्ला केला. या वेळी बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू झाला, तर दोघे पळून गेले. पोलिसांनी याप्रकरणी महेश सुतार, केतन कोदे, गणेश सुतार, सचिन अडूळकर (चौघे रा. विळे), सागर खानविलकर,(रा. भाले), संदीप कुरमे, शुभम धूपकर (दोन्ही रा. निजामपूर), संकेत सखाराम सुतार, रूपेश विलास सुतार, संतोष पडवळ (तिघे रा. म्हसेवाडी), नरेश जाधव (रा. फणसीडांग आदिवासीवाडी), सूरज बावधाने (रा. विळे, धनगरवाडी), करण श्रीपत म्हामुणकर (रा. पाटणूस) अशा १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच माणगाव उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील, निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक निरीक्षक आस्वर, उपनिरीक्षक कीर्तिकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी सात जणांना अटक केली असून, माणगाव न्यायालयाने १४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे; तर सहा आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81640 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..