मिरा-भाईंदर पालिकेची सुरक्षा वाऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईंदर पालिकेची सुरक्षा वाऱ्यावर
मिरा-भाईंदर पालिकेची सुरक्षा वाऱ्यावर

मिरा-भाईंदर पालिकेची सुरक्षा वाऱ्यावर

sakal_logo
By

भाईंदर, ता. ९ (बातमीदार) ः मिरा-भाईंदर पालिकेची महासभा सुरू असतानाच सुरक्षा व्यवस्था भेदून एक व्यक्ती थेट सभागृहात शिरली आणि व्यासपीठावरील महापौरांच्या आसनाजवळ पोहोचली. अनोळखी व्यक्ती थेट व्यासपीठावर पोहोचल्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. संतप्त झालेल्या महापौरांनी आणि सदस्यांनी या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. घुसखोरी करणाऱ्याचे नाव श्रीनिवास निकम असून ते प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत.
महासभा सुरू असताना नगरसेवक, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही सभागृहात जाण्यास परवानगी नसते. श्रीनिवास निकम यांनी सभागृहाच्या नागरिक कक्षात चहा आणि पाणी देण्यात आले नसल्यामुळे सभागृहात गेल्याचे सांगितले. मात्र, नियम मोडल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिकेचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिले. मात्र या प्रकरणामुळे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सभागृहात घुसखोरी केल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या गंभीर चुकीच्या निषेधार्थ महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी घुसखोरी केलेल्या व्यक्तीवर कारवाई होत नाही तोपर्यंत महासभा सुरू करणार नाही, असे घोषित केले. महापौरांच्या या भूमिकेला सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. या घटनेमुळे महापौरांसह सर्वच सदस्यांची सुरक्षा धोक्यात आली, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या गटनेत्या नीलम ढवण यांनी व्यक्त केली. दुसरीकडे या घटनेला जबाबदार धरून महापालिकेचे शिपाई मधुकर भोईर यांना प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले. प्रशासनाचा हा निर्णय चुकीचा असल्याचे महापौरांनी सांगितले. घडलेली घटना सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी असताना महापालिका कर्मचाऱ्याला निलंबित करणे चुकीचे असून प्रशासनाने निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अशी मागणीही महापौरांनी केली.

घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीवर प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल.
- दिलीप ढोले, आयुक्त, मिरा-भाईंदर.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81642 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top