कोविड रुग्णवाढीमुळे पालिका अलर्टवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड रुग्णवाढीमुळे पालिका अलर्टवर
कोविड रुग्णवाढीमुळे पालिका अलर्टवर

कोविड रुग्णवाढीमुळे पालिका अलर्टवर

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज २०० हून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. विशेष म्हणजे राज्यातील एकूण रुग्णांपैकी जवळपास ६० टक्क्यांहून अधिक रुग्ण मुंबईतील आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका अलर्ट झाली असून केंद्र सरकार आणि कोविड टास्क फोर्सच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, महापालिकेने मात्र मुंबईकरांना काळजी करू नका, असे आवाहन केले.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून पॉझिटिव्हिटीचा दरही आता एक टक्क्याच्या पुढे गेली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता महापालिका विविध उपाययोजना करत आहे. पुढील कार्यवाहीसाठी महापालिका केंद्र सरकार आणि कोविड टास्क फोर्सच्या नव्या मार्गदर्शक सूचनांच्या प्रतीक्षेत आहे. सध्या मुंबईतील केवळ २६६ केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये कोरोना चाचणी केली जात आहे. तिसऱ्या लाटेत केंद्र सरकारने लक्षणविरहित रुग्णांच्या तपासणीवर बंदी घातली होती. आता नव्याने चाचण्या करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित झालेली नाही. त्यामुळे मुंबईत मोजक्याच चाचण्या केल्या जात आहेत. याशिवाय परराज्यातून येणाऱ्या रेल्वेप्रवाशांची स्थानकांवर तपासणीही केली जात नाही. मुंबईसह राज्यात सध्या मास्क वापरणे बंधनकारक नाही; मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता काही राज्यांनी मास्क अनिवार्य केले आहे. या सर्व बाबींविषयी महापालिकेला आयसीएमआर, केंद्रीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि कोविड टास्क फोर्सच्या सूचनांची प्रतीक्षा आहे.
---
मुंबईत रुग्णसंख्या वाढत असली, तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरण्याची गरज नाही; मात्र काळजी घेण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पालिका दररोज रुग्णसंख्येवर बारीक लक्ष ठेवून आहे. चाचण्यांबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे येताच त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल. मास्क अनिवार्य नसले, तरी खबरदारी म्हणून मास्क घातलाच पाहिजे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोविड टास्क फोर्सकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत.
- संजीव कुमार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
----
केवळ एकच रुग्ण गंभीर
मुंबईत दररोज सरासरी शंभरहून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत; परंतु रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे. याशिवाय लसीकरणाचे प्रमाण अधिक असल्याने करत असल्याने विषाणूच्या तीव्रतेचा प्रभाव कमी आहे. सध्या मुंबईतील ७०६ सक्रिय रुग्णांपैकी केवळ एक रुग्ण गंभीर आहेच. इतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेने दिली.
---
रुग्णालयात केवळ १९ रुग्ण
मुंबईतील दररोजच्या नव्या रुग्णांपैकी ९८ टक्के रुग्ण लक्षणविरहित आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. सध्या केवळ १९ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. कोविड रुग्णांसाठी राखीव असलेल्या २५,२५९ खाटांपैकी २५,२४० खाटा रिकाम्या आहेत. याशिवाय ९१२ व्हेंटिलेटर खाटांपैकी ९११ व्हेंटिलेटर खाटा रिक्त आहेत. आयसीयूच्या १,६६५ खाटांपैकी १,६६२ खाटा रिक्त आहेत; तर ऑक्सिजनच्या ४,९१८ खाटा रिकाम्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81647 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top