नवी मुंबईला झोपडपट्ट्यांचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईला झोपडपट्ट्यांचा विळखा
नवी मुंबईला झोपडपट्ट्यांचा विळखा

नवी मुंबईला झोपडपट्ट्यांचा विळखा

sakal_logo
By

घणसोली, ता. ९ (बातमीदार) : स्वच्छ सुंदर नोड म्हणून नवी मुंबईतील घणसोली विभागाची ओळख आहे; परंतु गेल्या काही दिवसांत वाढत चाललेल्या झोपडपट्ट्यांमुळे घणसोलीच्या शोभेला डाग लागल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत्या झोपडपट्ट्यांवर महापालिका व सिडको प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास नवी मुंबईची अनधिकृत झोपडपट्ट्यांचे शहर म्हणून ओळख निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

केवळ घणसोली नव्हे तर नवी मुंबईतील प्रत्येक नोडमध्ये ठिकठिकाणी अनधिकृत झोपडपट्ट्या वाढत चालल्या आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांच्या आपापसांतील दैनंदिन भांडणामुळे स्थानिक नागरिक, परिसरातील दुकान चालकही वैतागले आहेत. येथील नागरिक दिवस-रात्र मद्यप्राशन करून आपापसांत भांडणे करत असतात. काही वेळा भांडणे मारामारीचे रूप घेऊन रक्तबंबाळ होईपर्यंतही होत असतात. अनेकदा ही भांडणे परिसरातील नागरिक येऊन सोडवत आहेत. याचा त्रास घणसोलीकरांना होत असल्याने अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई कधी होणार, अशी विचारणा होत आहे. दिवसेंदिवस त्रासदायक ठरत असलेल्या या झोपडपट्ट्यांवर महापालिकेने नियंत्रण मिळवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अतिक्रमणाची ठिकाणे
घणसोली विभागात प्रवेश केल्याबरोबर अनधिकृत झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. घणसोलीवरून शिळफाट्याच्या दिशेला जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली मोठ्या संख्येने नागरिक बस्तान बांधून बसले आहेत. पाम बीच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घणसोलीच्या रस्त्यावरही झोपडपट्ट्या वाढत चालल्या आहेत. साईबाबा मंदिराच्या जवळच्या बाजूच्या मोकळ्या भूखंडावर झोपडपट्ट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

व्यवसाय सुरू
झोपडपट्टीतील रहिवासी उघड्यावर कपडे, भांडी, स्वयंपाक, नैसर्गिक विधी उरकत असल्याने महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणाला ठेच पोहचत आहे. गृहपयोगी वस्तू या रस्त्यावर असल्याने या परिसराची शोभा कमी होत चालली आहे. काही झोपडपट्टीवासीयांनी या अनधिकृत जागी आपले व्यवसाय सुरू केले आहेत.

घणसोलीतील अनधिकृत झोपडपट्ट्यांवर महापालिकेने कारवाई केली पाहिजे, अन्यथा झोपडपट्टीवासीय जागेवर हक्क दाखवायला कमी करणार नाहीत.
- अक्षय कांबळे, नागरिक.

झोपड्या तोडल्या तरी ती लोकं पुन्हा आपले बस्तान बांधतात, परंतु महापालिकेच्या कारवाईनंतरही जागेवरून न हलणाऱ्या झोपडपट्ट्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
- महेंद्रसिंग ठोके, विभाग अधिकारी, घणसोली.

अनेकदा या नागरिकांवर कारवाई केलेली आहे. महापालिकेमार्फत उड्डाणपुलाभोवती जाळ्या लावण्यात आल्या आहेत, तरीही हे नागरिक जाळ्या तोडून त्या ठिकाणी राहतात. झोपडपट्टीवासीयांची संख्या कमी झाली आहे.
- प्रशांत गावडे, विभाग अधिकारी, कोपरखैरणे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81659 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top