२१५ भंगार वाहनांचे मालक सापडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२१५ भंगार वाहनांचे मालक सापडले
२१५ भंगार वाहनांचे मालक सापडले

२१५ भंगार वाहनांचे मालक सापडले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ९ ः रस्त्याच्या दुतर्फा वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या तब्बल २१५ बेवारस, भंगार वाहनांचे मालक अखेर सापडले आहेत. वाहतूक पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर संबंधित वाहनमालकांनी आपली भंगार वाहने हटवल्याने बेवारस गाड्यांचा प्रश्न निकाली लागण्यास मदत मिळाली. पर्यायाने रस्त्यांनीही मोकळा श्वास घेतला आहे.
ठाणे शहरातील रुंद रस्त्यांना बेवारस, भंगार वाहनांचे ग्रहण लागले आहे. येथील सेवा रस्त्यांसह महत्त्वाच्या मार्गावर दुतर्फा अशा हजारो वाहनांनी तळ ठोकले आहे. केवळ ठाणे शहरातच नव्हे, तर संपूर्ण वाहतूक पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये हीच गंभीर समस्या आहे. या भंगार बेवारस वाहनांमुळे रस्ता अडवला जात असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्त्याच्या सफाईवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी पावसाळ्यापूर्वी ही सर्व वाहने हटवण्याची मोहीम हाती घेतली. त्यानुसार १९ एप्रिलपासून सुरू झालेल्या या विशेष मोहिमेंतर्गत आतापर्यंत ८१४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. आपली वाहने उचला नाहीतर ती कचऱ्यात काढण्यात येतील, अशी तंबीही वाहतूक विभागाने दिली होती.
बेवारस वाहनांवर ४८ तासांच्या मुदतीच्या नोटिसा लावल्यानंतर जाग आलेल्या मालकांची धावपळ सुरू झाली. ८१४ पैकी २१५ वाहनमालकांनी संपर्क साधून आपली वाहने स्वतःहून हटवली आहेत. उर्वरित ५९९ बेवारस वाहनांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी संबंधित महापालिकेची मदत घेऊन टोर्इंगच्या सहाय्याने ही वाहने हटवून डम्पिंग यार्डमध्ये जमा करण्यात आली आहेत. त्यामुळे ठाण्यातील रस्त्यांवरील वाहनांचे डम्पिंग हटले असून रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

कुठे, किती वाहने हटवली
ठाणे नगर- १, कोपरी- ४५, नौपाडा-३८, वागळे- ३१, कापूरबावडी- ३२, कासारवडवली- ३१, राबोडी- १५, कळवा- ३०, मुंब्रा- ४१, भिवंडी- ४४, नारपोली- १८, कोनगाव- ८, कल्याण- २६, डोंबिवली- ६५, कोळसेवाडी- ९४, विठ्ठलवाडी- २, उल्हासनगर- २६, अंबरनाथ- ५२.

अपप्रवृत्तीला आळा बसणार
बेवारस भंगार वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होऊन शहर विद्रूप होते; पण त्यासोबतच या वाहनांचा आसरा अनेक गर्दुल्ले, अपप्रवृत्तीचे लोकही घेतात. अनेक वेळा या वाहनांच्या आडून महिलांची छेडही काढली जाते. त्यामुळे असुरक्षितता वाढते. या पार्श्वभूमीवर भंगार वाहने हटवण्याची मोहीम उघडण्यात आली असून, भविष्यातही ती सुरूच राहणार आहे. दरम्यान या मोहिमेंतर्गत भंगार वाहने डम्पिंग यार्डात लावण्यात येणार असून, कायदेशीर प्रक्रिया पार केल्यानंतर त्यांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81662 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top