
थॅलेसेमियाग्रस्त मुनावरला अकबरची खंबीर साथ
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : ‘जर मला लग्नानंतर असा दुर्धर आजार झाला असता तर माझ्या पत्नीने मला सोडून दिले नसते, या एका वाक्यावर माझा विश्वास कायम होता. म्हणून मी मुनावरसोबत विवाह केला’, असे ३१ वर्षीय अकबर अली ठामपणे सांगतात. जोगेश्वरी पश्चिमेतील वैशाली नगरमध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय मुनावर हिला जन्मापासून ‘थॅलेसेमिया’ हा आजार आहे. दर १५ दिवसांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात तिला रक्त चढवावे लागते; पण पती मुनावर तिच्यामागे खंबीरपणे उभे राहिले आहेत.
मुनावर आणि अकबर दोघे शाळेपासूनचे मित्र. वर्षभरापूर्वी जूनमध्ये दोघांनी आपला संसार थाटला. आजार प्रत्येकालाच असतो; पण त्यामुळे व्यक्तीला नाकारणे मला पटत नव्हते. हीच गोष्ट मी माझ्या कुटुंबालाही समजावून सांगितली. त्यानंतर त्यांनीही मुनावरला पूर्णपणे स्वीकारले. लोक फक्त बोलण्याचे काम करतात; पण कधीच कोणी कोणालाही विचारत नाही. त्यामुळे मी जगाचा विचार न करता मुनावरसोबत विवाह केला. आता तिची संपूर्ण जबाबदारी माझी आहे.
लग्नापूर्वी मुनावरने मला आपल्या आजाराविषयीची संपूर्ण कल्पना दिली. आता आठवड्यातून एकदा मुनावरसोबत मी इथे येतो. दोन ते अडीच तासांत रक्त चढवून झाले, की पुन्हा तिला घेऊन जातो. मुनावरच्या आजाराविषयी जाणून घेतले. डॉक्टरांसोबतही चर्चा केली. तिला कायमस्वरूपी रक्त चढवावे लागणार आहे. त्यासाठी आम्ही दोघेही तयार आहोत, अशी भावना अकबरने व्यक्त केली.
समाजासमोर आदर्श
मुनावरसारख्या अनेकांना दर १५ दिवसांनी रक्त चढवावे लागते. दररोज मृत्यूची टांगती तलवार थॅलेसेमियाग्रस्त मुलांवर असते. त्यांना शरीराच्या, उंचीच्या आणि दातांच्या समस्या असतात; पण त्यातूनही ते आपले जीवन आनंदाने जगतात. पण असे आयुष्य जगताना थॅलेसेमिया या दीर्घकालीन आणि अनुवंशिक आजाराच्या मुला-मुलींना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार मिळणे अनेकदा कठीण होते. पण मुनावरसोबत अकबरने विवाह करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
रुग्णालय प्रशासनाकडून कौतुक
दरवर्षी ८ मे या दिवशी जागतिक ‘थॅलेसेमिया दिन’ पाळला जातो. सेंट जॉर्ज रुग्णालयात थॅलेसेमिया रुग्णांसाठी विशेष युनिट आहे. जिथे या रुग्णांना दर आठवड्याला रक्त चढवावे लागते. सध्या सेंट जॉर्ज रुग्णालयात मुंबईतील १२० थॅलेसेमिया रुग्णांची नोंद आहे. थॅलेसेमिया दिनानिमित्त रुग्णालय प्रशासनाने उद्या (मंगळवार) सकाळी १०.३० वाजता या रुग्णांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ज्यात या रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनातर्फे या रुग्णांचे कौतुक केले जाणार असून एक सन्मानपत्रही देण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81663 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..