
पालिकेच्या ऑनलाईन सुविधेचा बोजवारा
कल्याण, ता. ९ (बातमीदार) ः नागरिकांना घरबसल्या कर भरता यावा, जन्म-मृत्यू दाखला मिळावा, तसेच इतर सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून पालिकेकडून ऑनलाईन सेवा देण्यात येते. ही सेवा ॲप आणि पालिकेच्या वेबसाईटच्या माध्यमातून दिली जाते. मात्र, मागील काही काळापासून ऑनलाईन सेवेत तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे कर भरण्यासाठी तसेच इतर कामांसाठी नागरिक पालिका मुख्यालयासह प्रभाग क्षेत्र कार्यालयांमध्ये गर्दी करत आहेत.
स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत पालिकेच्या ई-गव्हर्नन्सची अद्ययावत प्रणाली ८ एप्रिल २०२२ पासून सुरुवात झाली. त्या दिवसांपासून पालिका मुख्यालय आणि पालिकेच्या प्रभाग क्षेत्र कार्यालयामधील नागरी सुविधा केंद्रामधून महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे स्वीकारण्यात येणाऱ्या सर्व सुविधा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या असून सर्व सुविधांसाठी नागरिकांकडून महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातील काऊंटर्सवर ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मालमत्ता कर आणि पाणीबिलाची रक्कम ऑनलाईन आणि नागरी सुविधा केंद्रातील काऊंटरवर अदा करण्याची सुविधा २४ एप्रिलपर्यंत सुरू होत्या. ऑनलाईन सेवेची नवीन प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर सर्व सुविधा २ मेपासून पूर्ववत सुरू होणे अपेक्षित होते; मात्र आठ दिवसांनंतरही ही सुविधा नागरिकांना उपलब्ध नसल्याने पालिका मुख्यालयासहित प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान याविषयी पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, ऑनलाईन प्रणालीचे काम स्मार्ट सिटी विभाग एका ठेकेदारामार्फत करत आहे. मात्र या कामात अनेक त्रुटी आहेत. त्यामध्ये सुधारणा केली जात असून एक-दोन दिवसांत सुविधा मिळेल.
पालिकेच्या कारभारावर नाराजी
कॅशलेस सुविधेच्या नावाखाली पालिका ऑनलाईन सुविधा सुरू केल्याची घोषणा करते; मात्र आम्हाला सुविधा मिळत नाही. रांगेत उभे राहून बिल भरावे लागते. त्यामुळे पालिकेच्या स्मार्ट कारभाराच्या घोषणा कागदावरच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रभाग क्षेत्र कार्यालयात आलेल्या नागरिकांनी व्यक्त केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81673 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..