नवीन बांधकामांसाठी प्रक्रियायुक्त पाणी बंधनकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन बांधकामांसाठी प्रक्रियायुक्त पाणी बंधनकारक
नवीन बांधकामांसाठी प्रक्रियायुक्त पाणी बंधनकारक

नवीन बांधकामांसाठी प्रक्रियायुक्त पाणी बंधनकारक

sakal_logo
By

वाशी, ता.९ (बातमीदार) ः कोपरखैरणे व ऐरोली सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्रातील पाणी एमआयडीसीतील उद्योजकांबरोबर शहरात होऊ घातलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना व नवीन बांधकामांसाठी बंधनकारक करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची बचत व्हावी, या उद्देशाने पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सात मलनिस्सारण केंद्रातील प्रक्रियायुक्त पाणी वापराविना समुद्रात सोडण्यात येत होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या अमृत योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात ३०७ कोटी रुपये खर्चातून टर्शिअरी ट्रीटमेंट प्रकल्प उभारले आहेत. यातून प्रक्रिया केलेले ४० दशलक्ष लिटर पाणी एमआयडीसीला देण्याचा करार करण्यात आला आहे. सुरुवातीला महापे येथील काही लघु व मध्यम उद्योजकांना हे पाणी दिले जाणार आहे.
शहरात रखडलेल्या पुनर्विकासाला आता सुरुवात झाली आहे. सिडको व महापालिका प्रशासनाने शहरातील नऊ सोसायट्यांना आतापर्यंत पुनर्विकासाच्या परवानग्या दिल्या आहेत. वाशीत या प्रकल्पांची कामेही सुरू झाली आहेत. या बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे. यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर झाल्यास पाण्याचा अपव्यय होऊ शकतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुनर्विकासातील प्रकल्पांना प्रक्रियायुक्त पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. मोरबेतून येणारे पाणी जास्तीत जास्त पिण्यासाठी वापरून बांधकामासाठी प्रक्रियायुक्त पाणी दिले जाणार आहे.
कोपरखैरणे व ऐरोली येथे प्रकल्प उभारले आहेत. येथील पुनर्प्रक्रियायुक्त पाणी एमआयडीसी क्षेत्रात पुरवले जाणार आहे; तर पुनर्विकासासाठीच्या बांधकामांनाही हेच पाणी दिले जाणार आहे. मोरबेच्या पाण्याचा वापर बांधकामांसाठी होऊ नये, म्हणून महापालिका प्रशासनाकडून पुनर्विकासातील प्रकल्पाच्या ठिकाणी फक्त पिण्याच्या पाण्यासाठी अर्धा इंचाची नळजोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे त्यांना बांधकामांसाठी प्रक्रियायुक्त पाणी वापरण्याशिवाय पर्याय राहणार नाही.


४९५ कोटींचा महसूल
महापालिकेच्या प्रक्रियायुक्त पाणी विक्रीतून १५ वर्षांत पालिका व एमआयडीच्या सामंजस्य करारानुसार महापालिका १८ रुपये ५० पैसे प्रति घनमीटर दराने पाणी विक्री करणार आहे. त्यातून पालिकेला १५ वर्षांत प्रक्रियायुक्त पाणी विक्रीतून ४९४.५३ कोटी इतका महसूल मिळणार आहे.

व्यावसायिकांना फायदा
पिण्याचे पाणी हे ३० रुपये दराने बांधकाम व्यावसायिकांना दिले जात आहे; तर प्रक्रियायुक्त पाणी १८.५० रुपये दराने दिले जाणार आहे. त्यामुळे हे पाणी वापरणे व्यावसायिकांना परवडणार आहे.

आगामी काळात पिण्याच्या पाण्याची बचत करावी लागणार आहे. त्यामुळे मोरबेचे पाणी व्यावसायिक दराने बांधकामासाठी देण्यापेक्षा प्रक्रियायुक्त पाणी बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यातून पिण्याच्या पाण्याची बचत होईल. प्रक्रियायुक्त पाणी विक्रीतून महसूल मिळणार आहे.
- अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81680 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top