ठाणेकरांना सरसकट करमाफी नाहीच? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणेकरांना सरसकट करमाफी नाहीच?
ठाणेकरांना सरसकट करमाफी नाहीच?

ठाणेकरांना सरसकट करमाफी नाहीच?

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : ठाणेकरांना मालमत्ता करातून दिलासा मिळावा यासाठी पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफीचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला होता. तसेच ५०० चौरस फुटापर्यंतच्या मालमत्तांना सरसकट करमाफी देण्याचा दावा केला होता; मात्र प्रशासनाने सरसकट मालमत्ता करमाफी न देता केवळ मालमत्ता करातील सामान्य कर माफ केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी केलेला दावा फोल ठरल्याची चर्चा शहरात आहे.
२०१७ मध्ये पार पडलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेने ठाणेकरांना ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफीचे वचन दिले होते. या वचनपूर्तीसाठी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या सवर्साधारण सभेत ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफीचा ठराव मंजूर करण्यात आला. ज्या मालमत्तांचे चटईक्षेत्र ५०० चौरस फुटांचे असेल, अशा सर्वांनाच मालमत्ता करमाफीचा ठराव अंतिम करण्यात आला होता. त्यानुसार याची अंमलबजावणी २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून करण्याचेही निश्चित झाले होते. त्यानुसार हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे पाठवण्यात आला होता; त्याला सरकारने मंजुरी दिली आहे.
ही मंजुरी देत असताना मुंबईत ज्या पद्धतीने मालमत्ता करातील सर्वसामान्य कर माफ करण्यात आला, त्याच धर्तीवर ठाण्यातही सामान्य कर माफ करण्यात आला आहे; मात्र प्रशासनाने सरसकट मालमत्ता करमाफी न देता केवळ मालमत्ता करातील सामान्य कर माफ केल्याचे समोर आल्याने ठाणेकरांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

सुमारे ४५ कोटींचा बोजा
महापालिका हद्दीत पाच लाख ६० हजार करदाते आहेत, परंतु त्यातील ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मालमत्तांचा सर्व्हे सुरू आहे, ज्यांची माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यांची बिले नव्या नियमानुसार तयार करण्यात आली आहेत. असे असले, तरी किती करदात्यांचा मालमत्ता करातील सामान्य कर माफ झाला, हे महापालिकेला सांगता येत नसल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी ४५ कोटींच्या आसपास वार्षिक बोजा पडणार असल्याचे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
----

कोट ः
सरकारकडून कर माफीसंदर्भात प्राप्त झालेल्या पत्रानुसार मालमत्ता कर आकारणीची कार्यवाही करण्यात येत आहे.
- गजानन गोदेपुरे, उपायुक्त, मालमत्ता कर, ठामपा.

शिवसेनेची ठाणेकरांना ‘विश्वासघाताची वचनपूर्ती’ : आमदार निरंजन डावखरे
शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीसाठी केलेली घोषणा म्हणजे ठाणेकरांना ‘विश्वासघाताची वचनपूर्ती’ आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली. संपूर्ण करमाफीऐवजी शिवसेनेने केवळ ३१ टक्के करमाफी देत ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसली. यापुढे शिवसेनेचे आश्वासन म्हणजे ‘बड्या घरचा पोकळ वासा’ असेल, हे ठाणेकरांनी लक्षात ठेवावे, असा टोलाही आमदार डावखरे यांनी लगावला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81681 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top