
सनरायझर्स संघाला जेतेपद
मुंबई : सनरायझर्स संघाने शानदार खेळ करताना मल्हार बेसबॉल लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राचे जेतेपद पटकावले. ब्ल्यू इंडियन्स संघाचा एकतर्फी सामन्यात ३-० असा धुव्वा उडवत सनरायझर्स संघाने बाजी मारली. मुंबई उपनगर बेसबॉल संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नवोदित खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव देण्याच्या उद्देशाने दहिसर येथील गावठाण मैदानावर झालेल्या या लीगचे यंदाचे दुसरे वर्ष होते. राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या काही खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेत युवा खेळाडूंना आपल्या अनुभवाचा फायदा करून दिला.
कोरोना महामारीमुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या स्पर्धेत पिंक पँथर्स, ब्लॅक डेव्हिल्स, सनरायझर्स आणि ब्ल्यू इंडियन्स, अशा चार संघांचा समावेश होता. अंतिम सामन्यात एकहाती वर्चस्व राखलेल्या सनरायझर्स संघाने ब्ल्यू इंडियन्स संघाला प्रतिकाराची एकही संधी न देता दिमाखात जेतेपदावर नाव कोरले. विजेत्या सनरायझर्स संघाकडून तुषार लालवानी याने शानदार खेळ केला, तसेच उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या ब्लू इंडियन्सकडून मुस्ताकीम पीरझादे याची झुंज अपयशी ठरली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81682 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..