पामबीच मार्गावरील तलाव शुद्ध होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पामबीच मार्गावरील तलाव शुद्ध होणार
पामबीच मार्गावरील तलाव शुद्ध होणार

पामबीच मार्गावरील तलाव शुद्ध होणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. ९ : नवी मुंबईचे निसर्गसंपन्न आकर्षण केंद्र आणि सर्व नागरिकांच्या हृदयात सकाळच्या वेळेस प्राणवायू फुंकणारी फुप्फुसे म्हणून नावाजल्या जाणाऱ्या ज्वेल ऑफ नवी मुंबईतील तलाव आता शुद्ध राहणार आहे. आकाराने अतिशय मोठ्या विस्तृत जलाशयामध्ये आसपासच्या भागातील सांडपाणी येत असल्याने येथील पाणी दूषित होत असल्याच्या तक्रारी काही पर्यावरणतज्ज्ञ आणि नागरिकांनी केल्या होत्या. ही बाब लक्षात घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागास दिले होते. त्यानुसार या ठिकाणी जलउदंचन केंद्र आणि मलनिस्सारण वाहिनी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

आज तांत्रिक पाहणी करण्यात येऊन त्या ठिकाणी मलनिस्सारण वाहिनीची व्यवस्था करण्याचे तसेच जलाशयाकडे जाणाऱ्या सांडपाण्यास प्रतिबंध करण्यासाठी जलउदंचन केंद्र बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. या कामाची आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच ३१ मेपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. याप्रसंगी अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे व संबंधित अभियंते उपस्थित होते. ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या जलाशयात भरती – ओहोटीनुसार येणारे-जाणारे खाडीचे पाणी असावे व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा असू नये, याची काळजी घेतली जात आहे.

ज्वेल ऑफ नवी मुंबईपासून सीवूड मॉलपर्यंत ८० मिमी व्यासाची ५६० रनिंग मीटर लांब मलनिस्सारण वाहिनी टाकण्यात आलेली आहे. याकरिता ३ दशलक्ष लिटर क्षमतेचे प्रीफॅब्रिकेटेड पंपिंग स्टेशन उभे करण्यात आलेले आहे. ही प्रणाली व्यवस्थित रीतीने कार्यान्वित राहण्याच्या दृष्टीने २९ चेंबर्स बनविण्यात आलेले आहेत. तसेच करावे होल्डिंग पाँड, तांडेल उद्यान, बामणदेव मैदान आणि अमृतानंदमयी मार्ग अशा चार ठिकाणी स्क्रिनिंग व मॅन्युअल गेट बसविले जात आहेत.


सर्व कामे मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या जलाशयाच्या पाणथळ भागात सध्या काही प्रमाणात पक्षी दिसतात. येथील पाणी नैसर्गिकरीत्या स्वच्छ राहून पक्षांचा अधिवास वाढेल व ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या सौंदर्यात भर पडेल.
- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81689 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top