
कंटेनरने अडवला मुंब्रा-पनवेल बायपास
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : एकमेकांना धडकलेल्या कंटेनरने सोमवारी (ता. ९) पहाटेपासून मुंब्रा बायपास मार्गाच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजवले. धक्कादायक म्हणजे एकाच जागेवर आठ तासांच्या अंतरावर अपघाताच्या दोन घटना घडल्या. यामध्ये एक कंटेनर थेट नाल्यात; तर एक रस्त्यावरच आडवा झाल्याने संपूर्ण बायपास मार्ग अडवला गेला. या अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी पनवेल- ठाणे मार्ग पूर्णपणे ठप्प झाला. संध्याकाळी पाचपर्यंत वाहतूक कासवगतीने सुरू असल्यामुळे बायपासपासून दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मुंब्रा बायपास मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास डिझेल इंधनाने भरलेल्या कंटेनरने वाहनांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला धडक दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेलचा सडा रस्त्यावर पडला. हा अपघात मुंब्रा देवी मंदिरापासून उतार असलेल्या ठिकाणी घडला. वाहतूक पोलिसांनी तातडीने धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने तेलावर माती टाकली. तसेच अपघातग्रस्त दोन्ही कंटेनर हटवले; मात्र त्यादरम्यान वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आल्याने त्याचा परिणाम इतर कंटेनर वाहतुकीवर झाला. ही वाहतूक पूर्ववत होत असतानाच ऑईलवरील माती वाहनांमुळे बाजूला सारली गेली आणि निसरड्या रस्त्यावरून घसरून पुन्हा दोन ट्रक एकमेकांना आदळले.
अपघातग्रस्त एक ट्रक थेट नाल्यात गेला; तर दुसरा कंटेनर भर रस्त्यात आडवा पडला. ही घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. सिमेंट मिक्सरचा हा महाकाय कंटेनर हटवण्यासाठी वाहतूक पोलिसांना हायड्रा मशीन मागवावी लागली. दुपारी चारच्या सुमारास नाल्यातील ट्रक बाहेर काढण्यासोबतच रस्त्यात आडवा पडलेला कंटेनर एका बाजूला करण्यात आला. यादरम्यान पनवेल-ठाणे मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात आल्याने वाहनचालक भरउन्हात कोंडीत सापडले. बायपास ते वाय जंक्शनपर्यंत सुमारे दीड ते दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या. यामध्ये कंटेनरसह कामावर निघालेल्या चाकरमान्यांची लहान वाहनेही अडकल्याने मनस्ताप सहन करावा लागला.
गतिरोधकाने घात केला
मुंब्रादेवी मंदिरपासून उतारावर असलेल्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने पहिला अपघात घडल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. अचानक गतिरोधक दिसल्यामुळे कंटेनरचालकाने ब्रेक दाबला. त्यामुळे मागून वेगाने येणारा कंटेनर त्यावर आदळला व अपघात घडला. वास्तविक बायपास मार्गावर अनेक ठिकाणी असे गतिरोधक असून, त्यांना साईडपट्टी अथवा तिथे सूचना देणारे फलक नसल्याने वाहनचालकांना रात्रीच्या अंधारात त्यांचा अंदाज येत नसल्याचे या अपघातांच्या निमित्ताने समोर आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81693 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..