‘निसर्ग’ग्रस्त बागायतदार मदतीच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘निसर्ग’ग्रस्त बागायतदार मदतीच्या प्रतीक्षेत
‘निसर्ग’ग्रस्त बागायतदार मदतीच्या प्रतीक्षेत

‘निसर्ग’ग्रस्त बागायतदार मदतीच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९: निसर्ग चक्रीवादळात पूर्ण वाढ झालेली आंबा, काजू, नारळ, सुपारीची लाखो झाडे उन्मळून पडली. या झाडांपासून मिळणाऱ्या उत्पन्नापासून बागायतदारांना कायमचे मुकावे लागले. हे नुकसान पैशात न मोजता येण्यासारखे असल्याने राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रोजगार हमी योजनेतून पुनर्लागवड आणि पुनर्जीवन योजना सुरू केल्या. रायगड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेतून लागवड केली असून दोन वर्ष त्यांची चांगली जोपासणा करून झाडे जिवंत ठेवली आहेत; मात्र, रोजगार हमी योजनेतून जाहीर झालेली मदत येथील शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही.
कृषी विभागाकडून झाडांची रोपे घेऊन ती शंभर टक्के रुजवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येक झाडामागे एक ठराविक रक्कम मिळणार होती. यासाठी कृषी विभागाकडून संबंधित बागायतदारांच्या झाडांची पाहणीही देखील झाली, परंतु खात्यात काही रक्कम पडलेली नाही, असे म्हणणे मुरुड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी प्रभाकर भगत यांचे आहे. त्यांनी वीस वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेचा लाभ घेत शंभर हापूस आंब्याची झाडे लावली होती. त्या वेळेला त्यांना झाडांची लागवड, जोपासना, पाणी घालण्यासाठी पैसे मिळाले होते. हीच झाडे निसर्ग चक्रीवादळात भुईसपाट झाल्यानंतर राज्य सरकारने बंद झालेली रोजगार हमी योजनेतील फळलागवड योजना विशेष बाब म्हणून निसर्गग्रस्तांसाठी सुरू करण्यात आली होती. निसर्ग चक्री वादळाचा फटका रायगड जिल्ह्यातील २६ हजार शेतकऱ्यांना बसला. यात ७० टक्के आंबा, नारळ, सुपारीचे बागायतदार होते. सर्वाधिक निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील सुपारी पीक संकटात आले होते. अशा परिस्थितीत दापोली कृषी विद्यापीठातून सुपारीची रोपे बागायतदारांना उपलब्ध करुन देण्यात आली होती. ही रोपे शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने जिवंत ठेवली आहेत. परंतु त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

***
निसर्ग चक्रीवादळात बाधित क्षेत्र
सुपारी- ८२४ हेक्टर
नारळ- ७५२ हेक्टर,
काजू- १ हजार २०० हेक्टर
आंबा- ८ हजार ११३ हेक्टर,
चिकू - ३२२ हेक्टर अशा एकूण
एकूण- ११ हजार २८१ हेक्टर

निसर्ग चक्रीवादळात अनेक शेतकऱ्यांच्या बागा भुईसपाट झाल्या होत्या. याचा परिणाम नारळ सुपारीच्या उत्पन्नाबरोबरच पर्यटनावरही झाला होता. ही झाडे लावण्यासाठी राज्य सरकारने रोजगार हमी योजनेतून लाभ देण्याचे जाहीर केले होते. या भरवशावर झाडांची मेहनत घेत ते रुजवले होते. मात्र दोन वर्ष होत आली तरीही आम्हाला लाभ मिळालेला नाही.
- उज्ज्वल म्हात्रे, कल्पवृक्ष कॉटेज, अलिबाग

बंद करण्यात आलेली रोजगार हमी योजना खास निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील १३ कोटीचे वाटप झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व बागायतदारांच्या झाडांची पाहणी पूर्ण झालेली आहे. त्याचे अहवाल कृषी विभागाकडे आले असून, जसा निधी उपलब्ध होईल, तसा वाटप केला जाईल.
- दत्तात्रेय काळभोर, कृषी उपसंचालक, रायगड

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81694 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top