रायगडमध्ये एसटीची धूम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगडमध्ये एसटीची धूम
रायगडमध्ये एसटीची धूम

रायगडमध्ये एसटीची धूम

sakal_logo
By

पेण, ता. १० (वार्ताहर) : राज्यातील हजारो एसटी कामगार सहा महिने संपावर गेल्याने वेळापत्रक कोलमडून पडले होते. लांब पल्ल्याच्या प्रवाशांसह ग्रामीण भागातील नागरिकांचे यात प्रचंड हाल झाले. काही दिवसांपासून ही सेवा पूर्वपदावर येताच जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात एसटीची धूम वाढली आहे. यामुळे नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून त्यांना एसटीचा प्रवास पुन्हा करायला मिळणार आहे.
रायगड जिल्ह्यातील एकूण आठ आगारांतील दीड हजाराहून अधिक एसटीच्या ग्रामीण भागातील फेऱ्या पूर्ववत झाल्या आहे. परिणामी, प्रत्येक रस्त्यावर एसटी धावताना दिसत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांसह कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कामगार वर्ग पुन्हा एकदा नियमित कामावर हजर होऊ लागले आहेत. नागरिकांचे खोळंबलेली कामेही सुरू झाली आहेत. ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय दूर झाल्याने खिशाच्या कात्रीला लगाम बसला आहे. सुखकर प्रवास, आर्थिक बचत होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक, इतर पासधारक नोकरवर्गांना मिळणाऱ्या सवलतीसोबत एसटी जोमाने धावत असल्याने घंटीचा आवाज पुन्हा ऐकू येऊ लागला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड, अलिबाग, पेण, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरूड, माणगाव या आठ आगारांमधील एकूण १६९८ एसटीच्या फेऱ्या आत्तापर्यंत कार्यरत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्रलंबित कामे पुन्हा सुरू
अनेक शासकीय कार्यालये शहरात असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना सातत्याने ये-जा करावी लागत होती. त्यात एसटी बंद असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. खासगी वाहने भरमसाठ भाडे घेत असल्याने नागरिक मेटाकुटीला आले होते. आता ग्रामीण भागात एसटी सेवा पुन्हा सुरू झाल्याने प्रलंबित कामे करण्यासाठी नागरिक शहराकडे धाव घेत आहे.

विद्यार्थ्यांची पायपीट थांबली
एसटीमार्फत विद्यार्थ्यांना प्रवासामध्ये सवलत दिली जाते. यात ग्रामीण भागातून शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक फायदा होता. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्मचारी कामावर रुजू झाल्याने एसटी सेवा पूर्ववत झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सवलतीचा लाभ मिळू लागला आहे. परिणामी, मैलांची पायपीट थांबली आहे.


आगारनिहाय फेऱ्या
महाड - १३२
अलिबाग - २२६
पेण - ३४३
श्रीवर्धन - २००
कर्जत - २३८
रोहा - २३४
मुरूड - ६९
माणगाव - २१३
एकूण - १६९८

अनेक गावांत जाणारी एसटी बंद असल्याने खासगी वाहनांना जास्त भाडे देऊन प्रवास करावा लागला. पर्याय नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी तर पायी प्रवास केला. एसटी
पूर्वपदावर आल्याने अतिदुर्गम भागातील प्रवाशांना आधार मिळाला आहे.
- दिगंबर बाबर, एसटी प्रवासी

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दीर्घकाळ एसटी सेवा बंद होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. आता एसटी जोमाने सुरू झाल्याने ग्रामीण भागातील बंद पडलेली सेवाही पूर्ववत झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे, याचे समाधान वाटत आहे.
- अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक रायगड

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81732 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top