
उल्हासनगरात लेखा विभागातील लिपिकाला ठेकेदारांची मारहाण
उल्हासनगर, ता. ९ (वार्ताहर) : बिलाच्या फाईलवरून दोन ठेकेदारांनी लेखा विभागातील लिपिकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी उल्हासनगर महानगरपालिकेत घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात ठेकेदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ लेखा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद केले आहे.
जय भारत कन्स्ट्रक्शनचे मालक संजय चंदनानी व अजय चंदनानी हे फाईलबाबत विचारणा करण्यासाठी लिपिक संदीप बिडलान यांच्याकडे गेले होते. तेव्हा फाईल तपासतो, असे संदीप यांनी म्हटल्यावर चंदनानी यांनी संदीपला शिव्या देण्यास सुरुवात केली. संदीपने मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे यांच्याकडे जाण्यास सांगितल्यावर दोघांनीही संदीपला मारहाण केली. दोघेही मारहाण करत असल्याने संदीपनेही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या वेळी आवाज ऐकू येताच मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखापरीक्षक शरद देशमुख, अधिकारी विजय खेडकर, दीपक खेमानी व कर्मचारी धावून आले. घडलेल्या घटनेचा प्रकार पालिकेच्या वर्तुळात समजताच अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे, उपायुक्त आरोग्य डॉ. सुभाष जाधव यांनी लेखा विभागात धाव घेतली. वारंवार दमदाटीच्या घटना घडत असून आजची घटना गंभीर असल्याचे स्टाफने सांगितल्यावर किरण भिलारे यांच्या दालनात काम बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, संदीप बिडलान यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून ठेकेदार संजय चंदनानी आणि अजय चंदनानी यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81735 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..