
‘मन्नत’शेजारील इमारतीला आग
मुंबई, ता. ९ ः वांद्रे पश्चिम बॅण्डस्टॅण्ड परिसरात असलेल्या बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याजवळील टोलेजंग ‘जिवेश’ इमारतीच्या १४ व्या मजल्यावर सोमवारी रात्री आग लागल्याने काही काळ खळबळ उडाली. रात्री ७.४५ च्या सुमारास लागलेली आग तासाभरात विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आग विझवण्यासाठी महापालिकेचे आठ फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले होते. आगीवर तातडीने नियंत्रण मिळवल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली.
आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे. आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही.
मुंबई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी जात २१ मजली इमारतीतील आगीवर ताबा मिळवण्यास सुरुवात केली. सात जम्बो टॅंकर आणि अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांच्या मदतीने आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. इमारत उंच असल्याने आग वाढत गेली. समुद्राच्या वाऱ्याच्या झोतामुळे आग अधिक भडकत गेल्याचे सांगण्यात आले. रात्री ९ वाजून ५ मिनिटाने आग ‘लेव्हल २’ची असल्याचे जाहीर करण्यात आले. इमारतील राहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास एक तास कुलिंग ऑपरेशन राबवले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
तातडीने यंत्रणा पोहचल्या
वांद्रे बॅण्डस्टॅण्ड परिसरात शाहरूख खानसह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी राहतात. अगदी ‘मन्नत’च्या शेजारीच असलेल्या ‘जिवेश’ इमारतीत आग लागल्याने तातडीने मोठ्या प्रमाणात यंत्रणांनी तिथे धाव घेतली. आगीचे आणि धुराचे लोट परिसरात काही काळ पसरल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती; परंतु जवानांनी मोठ्या प्रयत्नाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81736 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..