
ग्रामीण पोलिस मुख्यालय भिवंडीत
भिवंडी, ता. १० (बातमीदार) ः ठाणे ग्रामीण पोलिसांना पोलिस मुख्यालय उभारणीसाठी भिवंडी तालुक्यातील वाशेरे आणि सापे या गावातील ४० एकर जमीन देण्यात येणार आहे. याविषयी महसूल विभागाने आदेश दिले आहेत. यासाठी नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे याबाबत मागणी केली होती.
महसूल विभागाच्या आदेशानुसार भिवंडी तालुक्यातील मौजे वाशेरे येथील ११ हेक्टर २० गुंठे, तर मौजे सापे येथील ४ हेक्टर ८० गुंठे अशी एकूण १६ हेक्टर म्हणजेच ४० एकर जमीन ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांना ठाणे ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या उभारणीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांना काही अटी-शर्तींसह ही जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही जागा मंजूर करण्यासाठीच वापरणे वापरकर्त्यांना बंधनकारक असेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
गुन्हेगारीला बसणार चाप
ठाणे ग्रामीण पोलिसांना बळकट करण्यासाठी यापूर्वीदेखील पालकमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेऊन मुंबई-आग्रा महामार्गावर २२ ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची मागणी मान्य करून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २ कोटी ५५ लाखांच्या निधीला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाणे ग्रामीण पोलिसांचे मुख्यालय उभारण्याची मागणी मान्य करून त्यासाठी जमिनीची पूर्तता केल्याने पोलिस दल अधिक सक्षम होऊन गुन्हेगारीला चाप बसवण्यात मदत होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81742 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..