
पालघरमधील बोटींना समुद्रमार्ग बंद
वसई, ता. १० (बातमीदार) : मान्सूनचे आगमन यंदा लवकर होणार असून, त्यामुळे खोल समुद्रात जाणाऱ्या मच्छीमार बांधवाना व बोटींना धोका उद्भवू नये म्हणून तीन महिने मासेमारी बंद ठेवण्याच्या सूचना मत्स्य विभागाने दिल्या आहेत. त्यातच वादळाचा इशारा दिल्याने बोटींना खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील हजारो बोटी किनाऱ्याला विसावणार आहेत.
पालघर जिल्ह्यातील सातपाटी, डहाणू, विरार, अर्नाळा, वसई, नायगाव कोळीवाडा, पाचूबंदर तसेच भाईंदर येथील उत्तन समुद्रकिनाऱ्यावर दोन हजारांहून अधिक यांत्रिकी बोटी आहेत. पावसाळ्यात समुद्रात येणारे वादळ पाहता मच्छीमारांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खोल समुद्रात जाण्यास बंदी करण्यात आली आहे. यंदा ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंद राहणार आहे.
यांत्रिकी बोटींना मासेमारी बंद ठेवण्यात येणार असून, पारंपरिक पद्धतीने केली जाणारी मासेमारी सुरू राहणार आहे. जून, जुलै महिन्याचा कालावधी माशांना प्रजोत्पनासाठी पोषक असतो. मासेमारी बंदी असल्यास बीजनिर्मिती प्रक्रियेला वाव मिळणार आहे. दरम्यान, डिझेलचे वाढते दर पाहता मासेमारीतून यंदा उत्पन्न कमी मिळाले. त्यातच महागाईचा फटका सर्वाधिक बसत आहे. नैसर्गिक संकटेदेखील वरचे वर येत असतात. तीन महिने कामाविना खर्च भागवायचा कसा, अशी चिंता मच्छीमार बांधवांना आता सतावत आहे.
साधनसामुग्री जप्त होणार
मासेमारी करताना बोटी आढळल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. मासेमारीचे साहित्य सामुग्री तसेच जर मासे सापडले, तर तेही जप्त करण्यात येणार आहेत, असा इशारा मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांना दिला आहे.
अपघातात झाल्यास नुकसानभरपाई नाही
मासेमारी बंदी कालावधीत बोटीचा अपघात झाल्यास प्रशासनाकडून कोणतीच नुकसानभरपाई दिली जाणार नाही. शहरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैल अंतरापर्यंत मासेमारी बंदी कालावधीत यांत्रिकी पद्धतीने बेकायदेशीर मासेमारी करू नये, याबाबत मच्छीमार संस्था, बोट चालकांना मत्स्य विभागाचे डॉ. अतुल पाटणे यांनी कळविले आहे.
मान्सून येण्याअगोदर व नंतर समुद्रात वादळ घोंघावत असते. तसेच माशांचा प्रजनन कालावधी असतो. यावेळी मच्छीमारांनी जीव धोक्यात घालून मासेमारी करण्यासाठी जाऊ नये. सरकारच्या नियमांचे पालन करावे.
- बर्नड डिमेलो, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय मच्छीमार कृती समिती
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81759 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..