
परवागनीअभावी रखडला उन्नत मार्ग
वाशी, ता. १० (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी कांदळवन विभागाची परवानगी मिळाली आहे. मात्र महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ॲथॉरिटी (एमसीझेडएमआर) तथा पर्यावरण विभागाची परवानगी अद्याप न मिळाल्याने घणसोली-ऐरोली उन्नत मार्गाचे काम रखडले आहे.
घणसोली नोड हस्तांतर झाल्यानंतर घणसोली-ऐरोली या जोड रस्त्यांच्या कामाला गती मिळाली. २४ डिसेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी व महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सदर काम गतिमान झाले आहे. मात्र पर्यावरण विभागाची परवानगी न मिळाल्याने उन्नत मार्गाचे काम रखडले आहे. जोड रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात असून पर्यावरण विभागाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे.
परवानगी मिळाल्यानंतर या कामाची निविदा काढण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. या मार्गामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली व एमआयडीसी क्षेत्रातील रहदारी सुरळीत होणार आहे तसेच नवी मुंबईत नव्याने होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबई, ठाणे, कल्याण तसेच डोंबिवलीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी जलद गतीने उपलब्ध होणार आहे.
प्रकल्पासाठी ८०० कोटींचा खर्च
सिडकोने नवी मुंबई शहर वसवताना बेलापूर ते ऐरोली असा २१.१५ किमी लांबीचा पामबीच रस्ता नियोजित केलेला होता. परंतु,१९.२० किमी लांबीचा रस्ता सिडकोने २००९ पर्यंत घणसोलीपर्यंत पूर्ण केला. त्यापुढील भागात कांदळवन असल्याने पर्यावरण व इतर प्राधिकरणाकडे मंजुरी मिळत नसल्याने १.९४ किलोमीटर लांबीचा केवळ ब्रीज बांधण्याचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेने मांडला. या प्रकल्पासाठी ८०० कोटी खर्च अपेक्षित आहे. मात्र हा खर्च महापालिका पेलू न शकल्याने तो प्रस्ताव रद्द करण्यात आला होता.
सिडकोकडून १२५ कोटींचे अर्थसाहाय्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत उन्नत मार्गाच्या कामाला गती देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. त्यानंतर महापालिकेने जुन्या प्रस्तावाप्रमाणे १.९४ किलोमीटर असलेला पुलाऐवजी ३.२ किलोमीटर लांबीचा प्रस्ताव बनवून सदर पूल मुलुंड ऐरोली टोल मार्गावरच्या ऐरोली-काटई पुलाला जोडण्याचे प्रस्तावित केले आहे. या पुलासाठी ३७२ कोटी रक्कम खर्च अपेक्षित आहे. तर पुलाच्या खर्चासाठी पालिकेने सिडकोकडे आर्थिक साहाय्य मागितले आहे. सिडकोने १२५ कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे हा प्रादेशिक नवीन लिंक मार्ग होणार असून त्यामुळे नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार आहे. पुलाचा फायदा मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांना होईल.
घणसोली-ऐरोली उन्नत मार्गासाठी कांदळवन विभागांची परवानगी मिळाली असून एमसीझेडएमआरची परवानगी मिळणे बाकी आहे. ही परवानगी मिळाल्यावर कामांची निविदा काढण्यात येणार आहे. पुलासाठी ३७२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
- अभिजित बांगर, आयुक्त
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81760 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..