५०० कुटुंबे भयछायेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

५०० कुटुंबे भयछायेत
५०० कुटुंबे भयछायेत

५०० कुटुंबे भयछायेत

sakal_logo
By

जीवन तांबे
चेंबूर, ता. १० ः भारतनगरमधील बंजारा पाडा, भीम टेकडी, समता चाळ परिसरातील घरांवर डोंगरउतारावरील भिंत कोसळून त्यात एकूण २१ जणांना जीव गमवावा लागला होता. या घटनेला लवकरच एक वर्ष होणार आहे; मात्र येथील ४०० ते ५०० कुटुंबे आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. आश्वासने देऊन अद्याप घरे देण्यात आलेली नाहीत. पावसाळा जवळ आला असल्याने त्या घटनेची पुनरावृत्ती होऊन जीव जाईल की काय, या भीतीने नागरिक त्रस्त आहेत.
बीएआरसी डोंगरावर भारतनगर, बंजारा पाडा, भीम टेकडी आणि समता चाळ वसलेली आहे. मुंबईतील कष्टकरी लोक इथे वास्तव्य करतात. डोंगरउतार असल्याने १८ जुलै २०२१ रोजी शनिवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस पडल्याने बंजारानगर, भीम टेकडी झोपडपट्टीतील घरांवर डोंगरउतारावर बांधलेली भिंत कोसळून त्यात एकूण २१ जणांचा मृत्यू झाला होता. महापालिकेने या परिसरातील एकूण ११५ ते ११६ धोकादायक घरांचे तात्पुरत्या स्वरूपात एमएमआरडीएने विष्णुनगरमध्ये बांधलेल्या इमारतीमध्ये पुनर्वसन केले आहे. मात्र अजूनही ४०० ते ५०० घरे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.
पावसाळ्यात सतत दरड कोसळत असल्याने एकूण ४०० मीटर संरक्षक भीत बांधण्याची आवश्यकता असताना आतापर्यंत म्हाडामार्फत बंजारा तांडा चाळीपर्यंत संरक्षण भीत म्हणून एकूण ६५ मीटर व भीम टेकडी येथे एकूण १५ मीटरची भीत बांधण्यात आली आहे. म्हाडामार्फत भिंत बांधण्यात येत आहे, मात्र पावसाळ्यात धोका होण्याच्या शक्यतेने ही कुटुंबे भीतीच्या छायेखाली जगत आहेत. अशीच परिस्थिती विष्णू नगर, भीम टोला, सह्याद्रीनगरचीही आहे.
धोकादायक स्थितीतील रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे म्हणून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, एम. पूर्व विभागाचे सहायक आयुक्त यांच्याकडे रहिवासी सतत पत्रव्यवहार करून पाठपुरवठा करीत आहेत. मात्र अधिकारी शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे, असे उत्तर देऊन वेळ मारून नेत आहेत. पावसाळा आला की नोटीस देतात आणि तात्पुरत्या स्वरूपात पालिकेच्या शाळेत पुनर्वसन करतात. पुन्हा बाहेर काढतात, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
...
नेते फिरकले नाहीत...
गेल्या वर्षी घटना घडली तेव्हा विविध पक्षातील नेते पाहणी करून गेले. त्यांनी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते; मात्र ते अद्याप फिरकले नसल्याने रहिवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.
...
म्हाडाने भिंत बांधली आहे, तरी धोका कायम आहे. भीतीचे काम अर्धवट केले आहे, अद्याप पूर्ण भिंत बांधण्यात आलेली नाही. मातीचा ढीग अद्याप उचललेला नाही.
- भीमराव साखरे, सामाजिक कार्यकर्ता
...
घराला तडे गेले आहेत. या पावसाळ्यात भिंत पडायची भीती आहे. गेल्या पावसात जीवघेणी घटना घडली तेव्हा विचारपूरस करायला नेते मंडळी आली. आता कोणीही फिरकत नाही. भिंत बांधली आहे, परंतु कधी काय होईल हे माहीत नाही.
- मनीषा पवार, रहिवासी
...
शासनाने धोरण निश्चित करून अंमलबजावणी केली पाहिजे. कृती आराखडा तयार केला पाहिजे. धोकादायक घरांचे पुनर्वसन केले पाहिजे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे.
- निधी शिंदे, माजी नगरसेविका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81765 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top