सर्वसामान्यांना मसाल्‍याचा जोरदार ठसका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वसामान्यांना मसाल्‍याचा जोरदार ठसका
सर्वसामान्यांना मसाल्‍याचा जोरदार ठसका

सर्वसामान्यांना मसाल्‍याचा जोरदार ठसका

sakal_logo
By

वाशी, ता. १० (बातमीदार) ः भारतीय आहारात मसाल्याचे महत्त्व फार आहे. बाजारात विविध कंपन्यांचे पॅकेट बंद मसाले अगदी दहा रुपयांपासून हजार रुपये किलोच्या दरात विकले जात असले, तरी उन्हाळ्याची चाहूल लागताच वर्षभरासाठी मसाला तयार करून घेण्यासाठी महिलांची लगबग असते. प्रत्येक जण खाण्यापिण्याच्या पद्धतीनुसार ते तयार करतो. मालवणी, घाटी, आगरी, कोळी आदी प्रकारचे मसाले बनवण्यात येतात; पण यंदा घाऊक बाजारात मसाल्याच्या किमतीत २० टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मसाल्याचा ठसका सर्वसामान्यांना चांगलाच झोंबणार आहे.
कडक उन्हात मिरची, हळद, मसाले करून ठेवले जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गृहिणींनी बाजारात जाऊन मसाल्याचे पदार्थ बनवण्याकडे पाठ फिरवली होती. मात्र यंदा घरगुती मसाला बनवण्याकडे महिलांचा कल आहे. मात्र इंधन दरवाढ, ट्रान्स्पोर्टचा वाढलेल्‍या खर्चामुळे मसाल्यात वापरण्यात येणारे जिन्नसही महागले आहेत.
मसालेदार, तर्री असलेले, चटकदार पदार्थ खाण्यात भारतीयांचा हातखंडा आहे. देशातील विविध भागांत मसाल्‍याची पिके घेतली जातात. याशिवाय सिंगापूर, इंडोनेशिया या देशांतून मसाल्याचे पदार्थ धने, जिरे, लवंग, दगडफूल भारतात येतात. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने मसाल्‍याच्या पदार्थांच्या किमती वाढल्‍याचे मसाला व्यापारी इम्रान मेहमन यांनी सांगितले.
पाच ते सहा महिन्यांपासून मसाला तयार करण्यासाठी लागणारे जिरे, दालचिनी, धने, हळद, तमालपत्र आदीची आवक कमी झाली आहे. महागाईने कळस गाठला असून हमालीमधील उतराई व चढाईचे दरही गगनाला भिडले आहेत. परिणामी मसाल्याच्या वस्तू महागल्या आहेत. त्‍यामुळे दर वर्षी तीन-चार किलोचा मसाला तयार करणाऱ्या महिला यंदा किलोभराच्या मसाल्‍याचे जिन्नस घेताना दिसत आहेत.

चांगल्या दर्जाची अख्खी हळद किलोमागे २० ते ३० रुपयांनी महागली असून सध्या १४० ते १८० रुपये भाव आहे. गेल्या उन्हाळ्यात गुंटूर मिरचीचे भाव किलोमागे १६० ते १८० रुपयांच्या घरात होते. यंदा २०० ते २४० रुपये आहे. लवंग, वेलची, दालचिनी, शहाजिरे, मिरी, जिरे, धने आदी वस्‍तूंच्या किमती वाढल्‍या आहेत; तर तमालपत्री, रामपत्री, जायपत्री, त्रिफळा आदीचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी स्थिर आहेत.
- इमरान मेहमन, मसाला व्यापारी

दरवर्षी घरीच मसाला केला जातो. साधारण फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून त्याची तयारी सुरू होते. मसाल्यासाठी मिरची खरेदी करणे, अन्य मसाले आणणे, ते वाळवून, तेलात भाजून त्यानंतर ते कुटण्यासाठी दिले जातात. यंदा मसाल्याचे दर वाढल्‍याने मसाले करताना हात आखडता घेतला आहे.
- रंजना रोडे, गृहिणी

मसाल्‍याचे जिन्नस - प्रतिकिलो दर रुपयांत
गुंटूर मिरची - २०० ते २४०
हिरवी वेलची - १५०० ते २५००
लवंग - ८०० ते १२००
दालचिनी - ४०० ते ६००
शहाजिरे - ५५० ते ७५०
मिरी - ६०० ते १०००
जिरे - १८० ते २३०
धने - १२० ते २२०
दगडफूल - १२०० - १३००

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81781 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top