फ्लेमिंगो शिल्पकृती सुमार दर्जाच्या ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फ्लेमिंगो शिल्पकृती सुमार दर्जाच्या ?
फ्लेमिंगो शिल्पकृती सुमार दर्जाच्या ?

फ्लेमिंगो शिल्पकृती सुमार दर्जाच्या ?

sakal_logo
By

तुर्भे, ता. १० (बातमीदार) : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई शहराच्या सौंदर्यात भर पडावी, म्हणून महापालिकेच्या वतीने फ्लेमिंगो सिटी ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील चौकाचौकात, रस्त्याशेजारी फ्लेमिंगोच्या शिल्पाकृती उभारल्या आहेत; मात्र स्वच्छ भारत अभियान स्पर्धा संपण्याच्या अगोदरच या फ्लेमिंगोचे रंग फिके पडले आहेत. त्यामुळे महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नवी मुंबई शहरातील नेरूळ, सीवूड्‍स, ठाणे खाडीकिनारी ऐरोली, वाशी, बेलापूर आदी ठिकाणच्या खाडीकिनारी पाणथळ जागेत फ्लेमिंगो पक्ष्यांचे स्थलांतर होत असते. फ्लेमिंगो पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता निदर्शनास येते. त्यामुळे नवी मुंबईची ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून ओळख अधोरेखित व्हावी, म्हणून शहरात अनेक ठिकाणी फ्लेमिंगो शिल्प बसवले आहेत. स्थापत्य विभागात सुमार दर्जाची कामे केली जातात, तोच कित्ता आता फ्लेमिंगो शिल्पांच्या बाबतीत गिरवला आहे. एका महिन्यापूर्वी शहरात गडद गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो बसवले होते. मात्र आता या फ्लेमिंगोचा रंग उडू लागला व ते सफेद दिसू लागले आहेत. त्यामुळे हे फ्लेमिंगो आहेत की बगळे, असा सवाल नवी मुंबईकरांना पडला आहे; तर सफेद पडलेल्या फ्लेमिंगोना पुन्हा गुलाबी रंग लावण्याची नामुष्की पालिकेवर आली आहे.

पावसाळ्यात फ्लेमिंगो तग धरतील का?
महापालिकेच्या वतीने ‘फ्लेमिंगो सिटी’च्या नावाखाली शहरभर फ्लेमिंगो नटवले आहेत. मात्र एक महिन्यातच हे फ्लेमिंगो फिके पडत गेल्याने आगामी पावसाळ्यात हे फ्लेमिंगो तग धरतील का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करीत असते; मात्र सदर कामांचा दर्जा सुमार असल्याचे फ्लेमिंगोच्या रंगावरून दिसून येत आहे.
- बाळासाहेब शिंदे,
प्रदेश उपाध्यक्ष, मनसे सहकार सेना

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81786 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top