
चार्जिंग स्टेशनचे काम समांतररित्या सुरू करावे
तुर्भे, ता. १० (बातमीदार) : पर्यावरणशील शहराच्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रमाणात इलेक्ट्रिकल वाहने वापरासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने प्रोत्साहन दिले जात आहे. या दृष्टीने इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनची सुविधा महापालिका क्षेत्रात उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी सर्व चार्जिंग स्टेशनचे काम एकाच वेळी समांतररीत्या सुरू करावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.
शहरात इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबतच्या कार्यवाहीचा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी (ता. १०) विशेष बैठक घेत आढावा घेतला. सद्यस्थितीत चार्जिंग स्टेशन उभारण्याकरिता २० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी त्वरित काम सुरू करता येईल, अशा १८ जागांबाबत विचारविनिमय करण्यात आला. या जागांची पालिका अभियंता आणि पॉवरग्रीडचे प्रतिनिधी यांनी दोन दिवसात संयुक्त पाहणी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले. चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम निर्धारित वेळेत होणे गरजेचे आहे. यासाठी पालिकेच्या परिवहन उपक्रमाने या कामावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष अभियंत्याची नेमणूक करावी, अशा सूचना केल्या.
चार्जिंग स्टेशनजवळ अन्य सुविधा
स्लो चार्जिंग व फास्ट चार्जिंगसाठी प्रत्येक वाहनाला लागणार्या वेळेची माहिती घेऊन चार्जिंग स्टेशनवर आलेल्या नागरिकांना विरंगुळ्यासाठी कॅफेटेरिया, तसेच प्रसाधनगृह व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आयुक्तांनी निर्देश दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81788 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..